Mohit Kamboj on Baba Siddique Murder Case : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते बाबा सिद्दिकी यांची काही महिन्यांपूर्वी मुंबईतील वांद्रे भागात हत्या झाली. लॉरेन्स बिष्णोई टोळीने ही हत्या केल्याचं समोर आलं आहे. दरम्यान, या हत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या गुन्हे शाखेच्या पथकाने बाबा सिद्दिकी यांचे पुत्र झिशान सिद्दिकी यांचा जबाब नोंदवून घेतला आहे. यामध्ये झिशान यांनी वांद्रे भागात काम करत असलेल्या १० बांधकाम व्यावसायिकांचा आणि दोन नेत्यांचा उल्लेख केला आहे. यापैकी एकजण राष्ट्रीय पक्षाचा नेता आहे तर दुसरे प्रादेशिक पक्षाचे विधान परिषद सदस्य आहेत. झिशान यांनी या १२ जणांवर कोणताही विशिष्ट आरोप केला नसला तरी या लोकांनी बाबा सिद्दिकींविरोधात पोलिसांत तक्रारी दाखल केल्या, त्यांच्यावर वाईट पद्धतीने टीका केल्याचा उल्लेख यांनी केला आहे. या वृत्तानंतर अनेक प्रसारमाध्यमांनी दावा केला आहे की झिशान सिद्दिकी यांच्या जबाबात नोंद असलेली एक व्यक्ती म्हणजे मोहित कंबोज आहेत. बाबा सिद्दिकी यांच्या हत्येपूर्वी मोहित कंबोज व बाबा सिद्दिकी यांच्यात संभाषण झालं होतं, असा दावा देखील प्रसारमाध्यमांनी केला आहे. त्यावर आता मोहित कंबोज यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

मोहित कंबोज म्हणाले, “झिशान सिद्दिकी यांच्या जबाबाची मोडतोड करून प्रसारमाध्यमं सादर करत आहेत. चार्जशीटवर माझं नाव नाही. ज्या दिवशी बाबा सिद्दिकी यांची हत्या झाली त्या दिवशी माझं व बाबा सिद्दिकी यांचं बोलणं झालं होतं. गेल्या १५ वर्षांपासून माझे व बाबा सिद्दिकी यांचे मधुर संबंध आहेत. आठवड्यातून दोन-चार वेळा आमचं बोलणं व्हायचं. त्याच्या हत्येच्या बातमीने मलाही धक्का बसला आहे. आम्ही दोघेही वांद्र्याचे रहिवासी आहोत. त्यामुळे आम्ही राजकीय, अराजकीय व बांद्र्याच्या विकासासंदर्भात गप्पा मारायचो.

मोहित कंबोज यांचा प्रसारमाध्यमांवर संताप

मोहित कंबोज म्हणाले, “बाबा सिद्दिकी महायुतीचे सदस्य होते, मी देखील महायुतीत आहे. त्यामुळे आम्ही अनेक विषयांवर बोलायचो. परंतु, प्रसारमाध्यमं झिशान सिद्दिकी यांच्या जबाबातील एक-दोन मुद्दे घेऊन त्याची मोडतोड करून सर्वासमोर सादर करत आहेत. या चुकीच्या पत्रकारितेचा मी निषेध नोंदवतो. तसेच मी गुन्हे शाखेला विनंती करतो की त्यांनी अटक केलेल्या आरोपींविरोधात मजबूत खटला दाखल करावा. या हत्या प्रकरणी आरोपींना कठोर शिक्षा व्हायला हवी. तसेच मी मुंबई पोलिसांना विनंती करतो की या हत्या प्रकरणाचं सत्य त्यांनी सर्वांसमोर मांडावं”.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.