मुंबई : शहरात अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. विविध पोलीस ठाण्यात मंगळवारी विनयभंग आणि बलात्काराचे ४ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यात एका डॉक्टरकडून तपासणीसाठी आलेल्या तरुणीचा विनयभंग, शेजारील मुलींकडून चिमुकलीवर बलात्कार, अनोळखी व्यक्तीकडून उद्यानात खेळणाऱ्या मुलीचा विनयभंग प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
गोवंडी येथे एका डॉक्टरने तपासणीसाठी आलेल्या १६ वर्षीय मुलीचा विनयभंग केला आहे. आरोपी डॉक्टरचा दवाखाना आहे. पीडित त्याच्या दवाखान्यात उपचारासाठी गेली होती. त्यावेळी डॉक्टरने पीडित तरुणीच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेत तपासणीच्या नावाखाली तिचा विनयभंग केला. रुग्णालयात उपचार घेऊन आल्यानंतर तिने पालकांंच्या संमतीने गोवंडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. गोवंडी पोलिसांनी याप्रकरणी आरोपी डॉक्टरविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ७५, तसेच पोक्सोच्या विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला.
चिमुकलीवर लैंगिक अत्याचार
अंबोली येथील घटनेत ९ वर्षाच्या मुलीवर तिच्या शेजारी राहणारी दोन मुले मागील एक वर्षांपासून लैंगिक अत्याचार करीत होती. ही मुले घरात जाऊन कुणी नसताना पीडित मुलीचा लैंगिक छळ करीत होती. तिला अश्लील चित्रफिती दाखवून तिच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत आरोपी हे कृत्य करीत होते. हा प्रकार कुणाला सांगू नये यासाठी ते तिला धमकावत होते. याप्रकऱणी अंबोली पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात बलात्कार, सामूहिक बलात्काराच्या कलम ६५ (२), ७० (२) तसेच पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
बलात्कारानंतर अल्पवयीन मुलगी गर्भवती
मुलुंड येथील एका नामांकित महाविद्यालयात शिकणाऱ्या १६ वर्षांच्या मुलीवर तिच्या १७ वर्षीय मित्राने बलात्कार केला. महाविद्यालयाजवळील रस्त्यावर आडोशाला ट्रकमध्ये आरोपीने पीडितेला फूस लावून नेले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या अत्याचारानंतर पीडित मुलगी २ आठवड्याची गर्भवती राहिली होती. ठाण्यातील एका रुग्णालयात तपासणीसाठी गेली असता हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी नवघर पोलिसांनी १७ वर्षीय विधीसंघर्षग्रस्त बालकाविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४, तसेच म १२, ४ आणि ८ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. विधीसंघर्षग्रस्त बालकाची रवानगी डोंगरी येथील बालसुधारगृहात करण्यात आली आहे.
अनोळखी व्यक्तीकडून चिमुकलीचा विनयभंग
मालाड पूर्व येथील एका उद्यानात खेळणाऱ्या ११ वर्षीय मुलीचा अज्ञात व्यक्तीने विनयभंग केल्याची घटना घडली. सोमवारी सकाळी ११ च्या सुमरासा पीडित मुलगी खेळत असताना एक अनोळखी इसम तिथे आला आणि त्याने तिचा विनयभंग केला. त्यानंतर हा इसम तेथून पळून गेला. याप्रकरणी तिच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीनंतर कुरार पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात विनयभंगाच्या कलम ७४, तसेच बालकांच्या लैंगित अत्याचारापासून संरक्षण (पोक्सो) च्या कलमाअन्वये गुन्हा दाखल केला आहे.