Monorail Update News मुंबई : चेंबूर-जेकब सर्कलदरम्यान सुरू असलेली मोनोरेल सेवा शनिवारपासून अनिश्चित काळासाठी बंद करण्याची नामुष्की मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणावर ओढवली आहे. ही सेवा तोट्यात चालवली जात असताना सातत्याने होणाऱ्या दुर्घटनांमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही निर्माण झाला. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे समोर येत असले तरी या प्रकल्पाचे आधुनिकीकरण, नवीन अत्याधुनिक प्रणालीद्वारे सेवेचे संचलन करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

चेंबूर-वडाळादरम्यान २० किमी लांबीच्या मोनोरेल मार्गिकेतील पहिला टप्पा २०१४ मध्ये, तर दुसरा टप्पा २०१९ मध्ये वाहतूक सेवेत दाखल झाला. मात्र या सेवेला मुंबईकरांची पसंती मिळाली नाही. केवळ २० किमी लांबीची एकच मार्गिका, मोनोरेल गाड्यांची कमी संख्या, कमी फेऱ्या आणि महत्त्वाचे म्हणजे ही मार्गिका मुख्य परिसरांशी वा अधिक वर्दळ असलेल्या परिसरांशी जोडणी नसल्याने प्रवाशांनी त्याकडे पाठ फिरवली. परिणामी, मोनोरेल प्रकल्प सध्या तोट्यात आहे. त्यातच तांत्रिक बिघाड होण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत.

त्यातच महिन्याभरात तीन मोठ्या दुर्घटना घडल्या. ऑगस्टमध्ये एकाच दिवशी दोन गाड्या बंद पडल्या होत्या. त्यातील दोनपैकी एका गाडीतील ५८८ प्रवाशांना गाडीचा दरवाजा तोडून बाहेर काढण्याची नामुष्की ओढवली होती. सोमवारीदेखील मोनोरेल गाडी बंद पडली होती. सध्या सेवेत असलेल्या मोनोरेल गाड्या जुन्या झाल्या आहेत. त्या परदेशी बनावटीच्या असून त्यांची दुरुस्ती करणे अवघड झाले आहे. तर नवीन १० पैकी ७ गाड्यांची चाचणी सुरू आहे.

नवीन गाड्यांसाठी नवीन प्रणाली कार्यान्वित करणे, अत्याधुनिक सिंग्नलिंग यंत्रणा कार्यान्वित करणे आणि प्रकल्पाचे आधुनिकीकरण करून प्रवाशांना सुरक्षित मोनोरेल सेवा पुरविणे यासाठी सेवा काही काळासाठी बंद करणे आवश्यक आहे. मोनोरेल अधिक सक्षम आणि सुरक्षित करून लवकरच सेवा पूर्ववत केली जाईल.- एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री, एमएमआरडीए अध्यक्ष