Rain Update in Mumbai Maharashtra: नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. काही दिवसांपूर्वी पश्चिम राजस्थानमधून पावसाने माघार घेतली. टप्प्याटप्प्याने मोसमी पावसाचा इतर भागातूनही परतीचा प्रवास सुरू होईल. दरम्यान, मुंबईत मोसमी पाऊस माघार घेण्यास अजून एक महिना जाईल. साधारण ऑक्टोबर महिन्यापर्यंत मुंबईत पाऊस सक्रिय राहील.
गेल्या आठवड्यात संपूर्ण राज्यात मोसमी पाऊस सक्रिय झाला आहे. याचबरोबर पावसाचा परतीचा प्रवास देखील सुरू झाला आहे. पावसाचा परतीचा प्रवास सुरू झाला असला तरी राज्यात पडणारा पाऊस हा परतीचा पाऊस नाही. काही विशिष्ट हवामान प्रणाली निर्माण झाल्यामुळे राज्यात मोसमी पाऊस पुन्हा सक्रिय झाला. मुंबईतही पावसाचा जोर होता. दरम्यान, पावसाचा परतीचा प्रवास सुरू झाला म्हणजे लगेच मुंबईतही मोसमी पाऊस माघार घेईल असे नाही. मुंबईत ऑक्टोबर महिन्यापर्यंत मोसमी पाऊस सक्रिय राहणार आहे. त्यानंतर हळूहळू मोसमी पावसाचा परतीचा प्रवास सुरू होण्याचा अंदाज आहे .
कारण काय ?
बंगालच्या उपसागरात सलग नवीन कमी दाबाची क्षेत्रे निर्माण होऊन ती पश्चिमेकडे सरकणार असल्याने मोसमी पाऊस अजून एक महिन्यापर्यंत सक्रिय राहणार आहे. त्यामुळे ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत मुंबईत अधूनमधून पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे.
कमी दाब क्षेत्र तयार झाल्यावर काय होते?
हवामानाच्या दाबाचा फरक असल्यामुळे आजूबाजूच्या भागातील जास्त दाबाची हवा कमी दाबाच्या भागाकडे वेगाने सरकते. त्यामुळे त्या भागात वाऱ्यांचा वेग वाढतो.समुद्र किंवा मोठ्या पाण्याच्या स्रोतांमधून बाष्पीभवन होऊन आर्द्र हवा वर चढते. हवा वर जाताना थंड होऊन ढग बनतात. ढगांमध्ये आर्द्रतेचे प्रमाण जास्त झाल्याने मुसळधार पाऊस, गडगडाट, विजांचा कडकडाट होऊ शकतो. कमी दाब क्षेत्र जर समुद्रावर असेल तर पावसाचे प्रमाण जास्त असते.उष्णकटिबंधीय समुद्रावर कमी दाब क्षेत्र तयार झाले तर ते पुढे तीव्र होत ‘डिप्रेशन’, ‘डीप डिप्रेशन’ ही स्थिती संभवते आणि अनेकदा त्याचे रूपांतर चक्रीवादळात होऊ शकते.
सध्या पावसाची स्थिती काय ?
पुढील दोन – तीन दिवस मुंबईत हलक्या सरींची शक्यता आहे, तर मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागात मेघगर्जनेसह पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. सध्या मराठवाड्यावर चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. या कालावधीत पावसाची फारशी शक्यता नाही. ढगांचा गडगडाट मात्र काही प्रमाणात असू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मुंबईतही पावसाने विश्रांती घेतली आहे. पुढील दोन – तीन दिवस मुंबईत पावसाची फारशी शक्यताही नाही.