मोसमी वाऱ्यांचा प्रवास विलंबाने
मुंबई-ठाण्यात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असला तरी प्रत्यक्षात रविवारी मोजक्याच सरी बरसल्या. आनंदाची बाब म्हणजे मोसमी वारे आणखी पुढे सरकले असून रायगडमधील श्रीवर्धनसह मध्य महाराष्ट्रातील महाबळेश्वर तसेच आणखी काही जिल्ह्य़ांत पाऊस सुरू झाला आहे. साधारण १० जूनपर्यंत महाराष्ट्रातील विदर्भ वगळता इतर भागात मोसमी वारे पोहोचलेले असतात. त्यामानाने केरळात लवकर येऊनही मोसमी वारे थोडे विलंबाने प्रवास करत आहेत. मात्र हवामान आता अनुकूल असून दोन दिवसांत हे वारे आणखी उत्तरेकडे म्हणजे मुंबईपर्यंत पोहोचतील, असा अंदाज आहे.
मोसमी वाऱ्यांसह आलेल्या ढगांनी कोकण किनारपट्टीनजिक गर्दी केल्याचे उपग्रहातील छायाचित्रांमधून दिसत आहे. मुंबई, ठाण्यात दोन दिवस मुसळधार पाऊस पडेल, अशी शक्यताही मुंबई हवामानशास्त्र विभागाने वर्तवली होती. मात्र रविवारी काही ठिकाणी आलेल्या जोरदार सरी वगळता मुंबईत फारसा पाऊस पडला नाही. रविवारी सकाळी साडेआठ पर्यंतच्या २४ तासात सांताक्रूझ येथे अवघा १ मिमी तर कुलाबा येथे २ मिमी पावसाची नोंद झाली. पाऊस कमी पडला असला तरी भर दुपारीही ढगांनी काळोख केल्याने कमाल तापमान खाली उतरले. सांताक्रूझ आणि कुलाबा येथे कमाल तापमान ३० अंश से.हून कमी राहिले. रत्नागिरीत अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. रविवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासात राज्यातील सर्वाधिक पावसाची नोंद रत्नागिरीतील मंडणगड येथे १५० मिमी झाली. जळगाव येथे १३७ मिमी, हर्णे येथे १४४ मिमी, सावंतवाडी येथे ११८ मिमी, तर श्रीवर्धन, रत्नागिरी व मराठवाडय़ातील सिल्लोड येथे प्रत्येकी १०० मिमी पावसाची नोंद झाली.