मुंबई : नैऋत्य मोसमी वारे अखेर केरळमध्ये दाखल झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली. मागील दोन दिवसांपूर्वी मोसमी वाऱ्यांची वाटचाल केरळच्या दिशेने होण्यास पोषक हवामान असल्याचे जाहीर करण्यात आले होते. दरम्यान, मागील १६ वर्षांच्या तुलनेत यंदा मोसमी वारे लवकर केरळमध्ये दाखल झाले असून हा विक्रम झाला आहे.
अरबी समुद्र, बंगालच्या उपसागरातही मोसमी वाऱ्याने आगेकूच केली आहे. केरळच्या बहुतेक भागासह उत्तर कर्नाटकातील कारवारपर्यंत मोसमी वारे धडकले आहेत. मोसमी वारे केरळमध्ये २७ मे रोजी दाखल होण्याचा हवामान विभागाचा अंदाज होता. पण, पोषक वातावरणामुळे मोसमी वाऱ्यांची वाटचाल जलद गतीने सुरू होती. दरम्यान, यंदा केरळमध्ये मोसमी वारे वेळेआधीच दाखल झाले आहेत. केरळमध्ये नैऋत्य मोसमी पाऊस सामान्यतः १ जूनच्या आसपास दाखल होतो. भारतीय हवामान विभागाच्या अधिकृत तारखेनुसार म्हणजेच १ जूनपूर्वी पाच दिवस आधी किंवा नंतर (म्हणजे २७ मे ते ५ जूनदरम्यान) पावसाचे आगमन होते. यानंतर पाऊस हळूहळू देशभर पसरतो.
यंदा नैऋत्य मोसमी वाऱ्याच्या वाटचालीसाठी पोषक स्थिती निर्माण झाल्यामुळे मोसमी पाऊस वेळेत केरळमध्ये दाखल होईल, असे भारतीय हवामान विभागाने म्हटले होते. त्यानुसार केरळमध्ये शनिवारी मोसमी पाऊस दाखल झाला आहे. गेल्या वर्षी १९ मे रोजी अंदमान-निकोबार बेटांवर नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी धडक दिली होती. त्यानंतर नियोजित वेळेच्या आधीच म्हणजेच ३० मे रोजी मोसमी पाऊस केरळमध्ये दाखल झाला होता.
१६ वर्षांचा विक्रम मोडला
यापूर्वी २३ मे २००९ रोजी मोसमी पाऊस केरळमध्ये दाखल झाला होता. त्यानंतर तब्बल १६ वर्षांनी शनिवार, २४ मे रोजी मोसमी पाऊस वेळेआधी केरळमध्ये दाखल झाला आहे.
मोसमी पाऊस दाखल झाला म्हणजे काय ?
भारताच्या भूमीवर नैर्ऋत्य मोसमी वारे पहिल्यांदा अंदमान-निकोबार बेटांवर आणि नंतर केरळमध्ये दाखल होतात. तेथून नंतर टप्प्याटप्प्याने मोसमी पाऊस महाराष्ट्र आणि देशात व्यापतो. साधारण मे महिन्यापासूनच राज्यात पाऊस हजेरी लावतो. मात्र तो मोसमी पाऊस नाही. मोसमी पावसाला सुरुवात झाली किंवा मान्सून सक्रिय झाला हे वातावरण, हवामानाची विशिष्ट स्थिती याबाबतच्या संकेतांच्या आधारे जाहीर केले जाते. केरळ आणि कर्नाटक किनारपट्टीवर १४ वर्षा मापन केंद्रे आहेत. त्यातील ६० टक्के म्हणजे ८ ते १० केंद्रांवर सलग दोन किंवा अधिक दिवस मिलिमीटर पावसाची नोंद झाली, तर ती मोसमी पावसाची चाहुल लागते.
मोसमी पाऊस या दिवशी केरळमध्ये दाखल झाला होता-
२०२४- ३० मे
२०२३- ८ जून
२०२२- २९ मे
२०२१- ३ जून
२०२०- १ जून