सायकल कट्टय़ावर भारत परिक्रमेचा प्रवास उलगडला
एखादा विशिष्ट हेतू घेऊन तुम्ही जेव्हा सायकिलग करता तेव्हा ती गोष्ट तुमच्या जगण्याशी जवळीक साधणारी हवी. तसेच ध्येयाचा सखोल अभ्यास करून त्याच्याशी एकनिष्ठ राहणेही तितकेच गरजेचे आहे. हे करीत असताना तुम्ही जेव्हा पराक्रम करण्याची िझग दूर ठेवाल तेव्हा तुमच्यावरील जबाबदारी अधिक वाढते आणि हेतू साध्य करण्याच्या अधिक जवळ जाता, असं मत सायकलपटू सचिन गावकरने व्यक्त केलं. नुकतंच महाराष्ट्र निसर्ग उद्यानात आयोजित करण्यात आलेल्या सायकल कट्टय़ाच्या तिसऱ्या पर्वात सचिनने मानसिक आरोग्याबाबत असणारे अज्ञान आणि गरसमज दूर करण्याच्या हेतूने २२३ दिवसांमध्ये देशभरातील २५ राज्यांतून केलेल्या १३ हजार किलोमीटर सायकल प्रवासाविषयी सादरीकरण केले. जवळपास ७० हून अधिक जणांनी कट्टय़ाला उपस्थिती दर्शवली. मुंबई, ठाणे, पनवेल येथून अनेक सायकलप्रेमींनी स्वत:च्या सायकलवरून कट्टय़ाला आले होते.
चोरीला गेलेले पसे, एटीएम, हार्डडिस्कमधला करप्ट झालेला डेटा आणि बाबांची बिघडलेली तब्येत यामध्ये स्वत:चे मानसिक स्वास्थ्य टिकवणेही एक प्रकारचे आव्हान होते असं सचिन म्हणाला. भारत परिक्रमा करत असताना कधीच कुठल्याच प्रदेशात असुरक्षित वाटले नाही. लोकांनी खूप भरभरून प्रेम देत सढळ हस्ते मदत केल्याचंही त्याने अनेक उदाहरणांसह सांगितलं. देशाच्या कानाकोपऱ्यात मराठी माणसं असून त्यांना त्यांच्यासाठी आपला मराठी माणूस भेटल्यानंतर आनंद गगनात मावत नसे. देशात सायकिलगविषयी प्रेम आहे, मात्र भारतात सायकलिंगसाठी आवश्यक पायाभूत सुविधांकडे कशा प्रकारे दुर्लक्ष करण्यात आले आहे, हे पटवून देताना त्यांनी विविध राज्यांतील उदाहरणं दिली. एवढय़ा लांबच्या प्रवासात आपण लोकांना त्यांच्यातलेच वाटावे यासाठी सचिन नेहमी आपल्या पेहरावाबाबत जागरूक असे. तसेच खाण्याचे चोचले न पुरवता त्या-त्या प्रदेशातील खाद्यपदार्थ खाण्याकडे त्याचा कल होता. तसंच तुम्ही स्वत:ला विशिष्ट सवयी लावून घेतल्यात तर तुमचे शारीरिक स्वास्थ्यही टिकून राहण्यास मदत होते, असंही तो पुढे म्हणाला.
लहान मुलांना मानसिक स्वास्थ्य टिकवण्यासाठीचे उदाहरण देताना सचिन नेहमी सायकलच्या चेनचा रूपकासारखा वापर करतो. सायकलला पुढे नेण्यासाठी सायकलची चेन जे कार्य करते तेच कार्य शारीरिक स्वास्थ्य टिकवण्यामध्ये मानसिक स्वास्थ्य करीत असल्याचंही तो म्हणाला. मानसिक आरोग्यासाठी कार्यरत असलेल्या ठाण्यातील इन्स्टिटय़ूट फॉर सायकॉलॉजिकल हेल्थ (आयपीएच) संस्थेशी सचिन गावकर गेल्या १४ वर्षांपासून संलग्न आहे. पेशाने शिल्पकार असलेला सचिन संस्थेच्या ‘आवाहन’ या दृकश्राव्य विभागासाठी काम करतो. ‘आयपीएच’च्या रौप्य महोत्सवानिमित्त सचिनने मानसिक आरोग्याबाबत असणारे अज्ञान आणि गरसमज दूर करण्याच्या हेतूने सायकलवरून कोलकाता, पूर्वाचल, मग काश्मीर, दिल्ली, पंजाब असा प्रवास करत ‘भारत परिक्रमा’ पूर्ण केली आहे. दूरदर्शनचे ज्येष्ठ वृत्तनिवेदक अनंत भावे यांची उपस्थिती कट्टय़ावर लक्षणीय ठरली. तसेच ठाणे ते न्यूझीलंड हा प्रवास साध्या सायकलने करणाऱ्या राजेश देशपांडेंनेही लोकांना आपल्या छोटेखानी भाषणातून मंत्रमुग्ध करून सोडले. सायकलिंग करण्यासाठी सामान्यांना प्रोत्साहन देणाऱ्या संकेत सुभेदारच्या ‘पेडल फॉर जॉय’ या ग्रुपतर्फे बनवण्यात आलेली एक विशेष चित्रफीतही या वेळी दाखवण्यात आली. डिम्पग ग्राऊंडवर तयार करण्यात आलेल्या जगातील पहिल्या महाराष्ट्र निसर्ग उद्यानाचे उपसंचालक अविनाश कुबल यांनी ‘सायकल कट्टा’च्या संकल्पनेला संपूर्ण सहकार्य केल्यामुळे पहिल्यांदाच निसर्गाच्या सान्निध्यात सायकल कट्टा पार पडला.
संग्रहित लेख, दिनांक 27th Oct 2015 रोजी प्रकाशित
विशिष्ट हेतूसाठी सायकलिंग करताना जबाबदारी अधिक – सचिन गावकर
विशिष्ट हेतू घेऊन जेव्हा सायकिलग करता तेव्हा ती गोष्ट तुमच्या जगण्याशी जवळीक साधणारी हवी.
Written by चैताली गुरवguravchaitali
Updated:

First published on: 27-10-2015 at 07:59 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: More responsibility on ur shoulder while cycling for specific purpose says sachin gaonkar