भेंडी बाजारातील ११७ वर्षे जुनी ‘हुसैनी’ ही अतिधोकादायक इमारत कोसळल्यामुळे जुन्या मोडकळीस आलेल्या इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेला आहे. मुंबई शहरात १९४० पूर्वीच्या तब्बल १२ हजारांहून अधिक इमारती असून यापैकी अनेक इमारती धोक्याच्या छायेत आहेत. यंदा अधिकृतपणे नऊ इमारती ‘म्हाडा’ने अतिधोकादायक जाहीर केल्या असल्या तरी धोकादायक गटवारीत असंख्य इमारती आहेत. या इमारतींची तातडीने पुनर्बाधणी आवश्यक आहे. ‘स्मार्ट सिटी’ची स्वप्ने दाखविणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याबाबतचे धोरण कधी अमलात आणणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हुसैनी ही इमारत कोसळल्यामुळे मोडकळीस आलेल्या इमारतींबाबत आता पुन्हा विविध घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. परंतु त्यानंतर काहीही होत नाही, असा नेहमीचा अनुभव रहिवाशांना येतो. दरवर्षी मे महिन्यात अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर केली जाते. ही यादी जारी केल्यानंतर म्हाडा अधिनियम ९५ अन्वये रहिवाशांना नोटिसा जारी केल्या जातात. या नोटिसांचा पाठपुरावा केला जातो. परंतु रहिवाशी इमारत रिक्त करीत नाहीत. पावसाळ्यात यापैकी एखादी इमारत तरी कोसळते आणि त्यानंतर आम्ही नोटिस दिली होती, असे सांगून म्हाडाकडून हात वर केले जातात. पालिकेकडूनही हीच पद्धत वापरली जाते. परंतु मुंबईत ज्या इमारतींची तातडीने पुनर्बाधणी आवश्यक आहे अशा आजच्या घडीला १४ हजार ३७५ इमारती आहेत. यापैकी १९४० पूर्वीच्या १२ हजार १२९ इमारती आहेत तर १९४० ते १०५० या काळातील ९९६ तर १९५१ ते १९६९ या काळातील १,२७७ इमारती आहेत. मुळात मुंबईत १९ हजार ६४२ इमारती होत्या. त्यापैकी पाच हजार २६७ इमारतींची पुनर्बाधणी झाली आहे. यापैकी काही इमारती म्हाडाच्या इमारत व दुरुस्ती मंडळाने बांधल्या आहेत तर काही इमारती विकास नियंत्रण नियमावली ३३ (७)(९) या अंतर्गत विकसित करण्यात आल्या आहेत. हा वेग खूपच कमी आहे. दरवर्षी अतिधोकादायक ठरलेल्या इमारतींची संख्या वाढत चालली आहे. काही वेळा धोकादायक असलेली इमारतही कोसळत आहे.अशावेळी एकमेकांकडे अंगुलिनिर्देश करण्याची यंत्रणांची पद्धत आहे. परंतु या इमारतींच्या पुनर्बाधणीसाठी आवश्यक ठोस धोरण अद्यापही आणले जात नाही, ही वस्तुस्थिती आहे. समूह पुनर्विकास हा एक उपाय असला तरी यासाठी शहरात कमी आकारमानाच्या भूखंडावर पुनर्विकासाला परवानगी मिळावी, अशी मागणी गेले काही वर्षे केली जात आहे.

परंतु त्यास शासनाने अद्याप अनुकूलता दाखविलेली नाही. विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेंडी बाजार समूह पुनर्विकासाला तातडीने मंजुरी देऊन पाऊल उचलले आहे. मात्र तसे प्रस्ताव अद्याप पुढे आलेले नाहीत, असेही कारण पुढे केले जात आहे.

वाढीव चटई क्षेत्रफळाची प्रतीक्षाच..

जुन्या व मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्विकासाबाबत माजी मुख्य सचिव दिनेश अफझलपूर यांनी केलेल्या शिफारशी शासनाने स्वीकारल्या आहेत. परंतु या समितीच्या शिफारशीनुसार अतिरिक्त वा प्रोत्साहनात्मक चटई क्षेत्रफळ निर्देशांक किती उपलब्ध करून द्यायचा, याचाच अद्याप शासन पातळीवर विचार सुरू आहे. विकास नियंत्रण नियमावली ३३(९) नुसार चार इतके चटई क्षेत्रफळ उपलब्ध असले तरी ते पुरेसे नाही, असे विकासकांचे मत आहे.

नेत्यांमुळे गोंधळ

दुपारी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता, उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर व भाजप प्रवक्त्या शायना एनसी व त्यानंतर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनास्थळी भेट दिली. आधीच हा परिसर अत्यंत दाटीवाटीचा असल्याने मदतकार्यात अडचणी येत होत्या. त्यात बघ्यांनी मोठय़ा प्रमाणावर गर्दी करताना जखमींना रुग्णालयात नेतानाही गर्दीतून वाट काढावी लागत होती.

महिनाभरातील इमारत दुर्घटना

  • सिद्धिसाई इमारत – २५ जुलै रोजी सकाळी साडेदहा वाजता घाटकोपर येथील सिद्धिसाई ही चार मजली इमारत कोसळली. या दुर्घटनेत १७ जणांचा मृत्यू झाला, तर १३ जखमी झाले. या संदर्भात तळमजल्यावरील संरचनेत बदल केलेल्या सुनील शितपविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
  • क्रिस्टल बिझनेस पार्क – चांदिवली परिसरातील ही इमारत पाडताना २६ ऑगस्ट रोजी क्रेन आणि पोकलेन यंत्र सातव्या मजल्यावरून कोसळल्यामुळे सहा कामगारांचा मृत्यू झाला. याबाबत बिल्डरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

पावसाळ्यातील इतर घटना

२९ ऑगस्ट रोजी पडलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईत आठ जणांचा मृत्यू झाला. यात मॅनहोलमध्ये पडल्याने मृत्यू झालेल्या डॉ. अमरापूरकर यांचा समावेश आहे. चेंबूर येथील पार्क साइट परिसरात २० जुलैला नारळाचे झाड पडून कांचन नाथ यांचा मृत्यू झाला. त्यापूर्वी ६ जून रोजी नेव्हीनगरमध्ये राहुल विपिन कुमार या आठवीतील विद्यार्थ्यांचा आणि १ जुलै रोजी बोरिवली पश्चिमेला रिक्षाचालक राजमणी यादव यांचा मृत्यू झाला.

कामगारांचा मृत्यू

हुसैनी इमारतीच्या तळमजल्यावर मिठाई तयार करण्याचा छोटेखानी कारखाना होता. त्या कारखान्याच्या पुढील गाळ्यात अनेक कामगारही राहत होते. मिठाई तयार करणाऱ्या या छोटेखानी कारखान्यात बिहारहून आलेले अनेक कामगार होते. भेंडी बाजारातील ‘आलमवीर’ या हॉटेलमधील दोन स्वयंपाकी हुसैनीच्या तळमजल्यावरच राहत होते. अनेक हॉटेलांमध्ये जेवण पाठविण्याचे काम या तळमजल्यावरुन होत असे. गेल्या १० ते १२ वर्षांपासून मुंबईत राहणाऱ्या या कामगारांपैकी अनेकांचा मृत्यू झाल्याचे समोर येत आहे. यापैकी कौयुम अली (२४), बाबू अली (१८), समीउल्ला अली (२२), नासिर अली (२२), राहिस अली (३०) यांचा मृतदेह सापडला असून इतरांची ओळख पटत नसल्याचे रुग्णालयाने सांगितले.

दुरुस्ती केलेल्या इमारतींनाही धोका

मुंबई : हुसैनी इमारत कोसळल्यामुळे आजुबाजूच्या दोन इमारतींनाही तडे गेले असून या परिसरातील सर्वच इमारतीमधील रहिवासी हवालदिल झाले आहेत. या परिसरातील बहुतेक सर्वच इमारती तीस वर्षांहून जुन्या असून म्हाडाने केलेल्या दुरुस्तीबाबतही रहिवाशांना भरवसा वाटत नसल्याच्या प्रतिक्रिया स्थानिकांनी दिल्या.

टेमकर गल्लीतील इमारतींची दुरुस्ती न झाल्याने येथील सर्व रहिवाशी जीव मुठीत धरून बसले आहेत, असे मिसबा शेख म्हणाले. या भागातच राहणारे हुसेन काजी यांनीही या प्रकारचे मत मांडले. या भागातील काही जुन्या इमारतींची पूर्णबांधणी झाली असली तरी इतर इमारतींचे बांधकाम जीर्ण झाले आहे. आमची हरूम मंजिल इमारतदेखील काही वर्षांपूर्वी दुरुस्त करण्यात आली. पण कोसळलेल्या हुसैनी इमारतींमुळे आमच्या इमारतीची पुन्हा चाचणी करून घेण्याची गरज वाटत आहे, असे काजी यांनी सांगितले.

या भागात म्हाडाने पुनर्बाधणी केलेल्या अनेक इमारतींची अवस्थाही बिकट आहे. हुसैदी इमारत पुन्हा बांधून ३० वर्षे झाली आहेत.  त्यामुळे जुन्या इमारतींमधील नागरिकांप्रमाणेच आम्हीही आजच्या घटनेने भयभीत झालो आहोत, असे मत उष्मेर चष्मेवाला यांनी मांडले.

येथील बहुतांश इमारतींना म्हाडा आणि पालिकेकडून इमारती रिकामी करण्याच्या नोटीस दिल्या गेल्या आहेत. मात्र बहुतांश इमारतींची मालकी ट्रस्टच्या हातात असल्याने ट्रस्टचालक जोपर्यत पूनर्वसनासाठी जागेची उपलब्धता करून देत नाही तोपर्यत रहिवासी जागा रिकामी करू शकत नाही. माझे उपहारगृह असलेली इमारत दुरुस्त करून घेण्यात आली आहे. मात्र या भागातील इमारतींना दुरुस्त करून घेणे हा उपाय नसून त्याठिकाणी नवीन इमारत उभारणे हा यावरील उपाय आहे, असे मोहम्मद कुरेशी म्हणाले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: More than 12000 dangerous buildings in mumbai
First published on: 01-09-2017 at 01:51 IST