आईने आयपीएलचा सामना पाहण्यास मनाई केल्याने १८ वर्षांच्या तरुणाने आत्महत्या केली आहे. मुंबईच्या जोगेश्वरी येथे सोमवारी ही धक्कादायक घटना घडली. १२ वीत शिकणा-या निलेश गुप्ता याने आईच्या ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं वृत्त इंडियन एक्सप्रेसने दिलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नीलेश गुप्ता हा युवक सोमवारी ९ वाजून ३० मिनिटांच्या सुमारास आयपीएल पाहात बसला होता. तेवढ्यात त्याच्या आईने पाण्याच्या टाकीकडे लक्ष देण्यास त्याला सांगितलं. त्याला निलेशने नकार दिला, त्यावर आईने टीव्ही बंद करण्यास सांगितलं. यावरून दोघांमध्ये बाचाबाची सुरू झाली. रागाच्या भरात आईने टीव्ही बंद केला आणि स्वतः पाण्याची टाकी चेक करण्यास बाहेर गेली. त्यावेळी निलेश आणि त्याची छोटी बहिण घरी नव्हते. 15 मिनिटांनी आई परतल्यावर तिला घराचा मुख्य दरवाजा आतमधून बंद असल्याचं लक्षात आलं. बेल वाजवून आणि बराच वेळ आवाज देऊनही निलेशकडून काही प्रतिसाद न आल्याने आईने शेजारच्यांना बोलावून घराचा दरवाजा तोडला. त्यावेळी निलेशने स्वतःला फास लावून घेतल्याचं त्यांना दिसलं. तातडीने निलेशला रूग्णालयात दाखल करण्यात आलं पण तेथे त्याला मृत घोषीत करण्यात आलं.

निलेश हा बी.कॉमचा विद्यार्थी होता आणि क्रिकेट त्याला खूप जास्त आवडायचं असं त्याचे वडील अनिल गुप्ता यांनी सांगितलं. आंबोली पोलीस स्थानकातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस अजून चौकशी करत आहेत.