मुंबई : शिवसेना शिंदे गटातील नेते, खासदार गजानन कीर्तीकर आणि नेते रामदास कदम यांच्यातील वादावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर पडदा पडला.

मुंबईतील उत्तर-पश्मिच लोकसभा मतदारसंघावरून शिंदेंच्या शिवसेनेतील खासदार गजानन कीर्तिकर आणि नेते रामदास कदम समोरासमोर उभे ठाकले होते. कीर्तीकरांनी रामदास कदमांना ‘गद्दार’ उपमा दिल्याने व क दम यांनी कीर्तीकर याच्या खासगी जीवनावर तोफ डागल्याने दोन्ही नेत्यांमध्ये वातावरण चांगलेच तापले होते. पण, प्रथम कीर्तीकरांनी यावर पडदा टाकण्याचा निर्णय घेतला व नंतर मंगळवारी सायंकाळी कदम यांनी मुख्यमंत्र्यांशी त्यांचा वर्षां निवासस्थानी भेट घेतली व त्यांनीही वाद मिटल्याचे जाहीर केले. पण हे सांगताना त्यांनी मनातील खदखदही त्यांनी व्यक्त केली. कीर्तीकरांच्या आरोपांमुळे व्यथित झालो असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा >>> आरक्षणासाठी कोणी काय केले हे २४ डिसेंबरनंतर समाजासमोर मांडणार; मनोज जरांगे आक्रमक

मुंबईतील उत्तर-पश्चिम लोकसभा जागेसाठी रामदास कदम यांनी आपला मुलगा सिद्धेश कदम हा उमेदवार असेल असे म्हणत दावा केला. त्यानंतर मागील काही दिवसांपासून खासदार गजानन कीर्तीकर आणि रामदास कदम यांच्यात आरोप, प्रत्यारोप सुरू झाले होते. रामदास कदम यांनी गजानन कीर्तीकर यांच्यावर टीका करताना थेट त्यांच्या खासगी जीवनावर टीका केली.

पक्षातील दोन नेत्यांमध्ये सुरू असलेल्या वादाची दखल शिंदे गटाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी घेत गजानन कीर्तीकर यांच्याशी चर्चा केल्यानंतर वर्षांवर रामदास कदम यांच्यासोबत चर्चा केली. यावेळी बोलताना कदम यांनी म्हटले की, आमच्यातील वादावर पडदा पडला आहे. कीर्तीकर यांनी थेट प्रेस नोट काढण्यापेक्षा मुख्य नेत्यांसोबत चर्चा करावी. मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघातून कीर्तीकर हे खासदार आहेत आणि भविष्यात पक्षाने त्यांना उमेदवारी दिल्यास आपण त्यांच्या प्रचाराला जाऊ ,असेही कदम यांनी स्पष्ट केले.

कीर्तीकरांवरील टीकेचे समर्थन

गजानन कीर्तीकरांच्या खासगी आयुष्यावरून केलेल्या टीकेचे रामदास कदम यांनी समर्थन केले. खासगी टीका करणे योग्य असल्याचे त्यांनी सांगितले. रामदास कदम यांच्यावर गद्दारीचा आरोप करणे हे कितपत योग्य आह़े़, रामदास कदमला संपवण्यासाठी प्रेसनोट काढणे किती योग्य, असा प्रश्नच कदम यांनी केला. ३० वर्षांनंतर मी त्यांना पाडण्याचा प्रयत्न केला, हे आता कळलं का?़ज्याची जळते त्याला कळते अशा शब्दांत आपली खदखद व्यक्त करत कदम यांनी आता वाद संपला असल्याचे म्हटले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भांडत बसलो तर चुकीचा संदेश जाईल

माध्यमांशी बोलताना गजानन कीर्तीकर म्हणाले, रामदास कदम आरोप करतात म्हणून मी प्रत्युत्तर देणार नाही. याप्रकरणावर माझ्याकडून पडदा टाकण्यात आला आहे. मी माझ्या भावना मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केल्या आहेत. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वावर मला विश्वास आहे. आम्हीच भांडत बसलो, तर शिवसैनिकांपर्यंत चुकीचा संदेश जाईल. त्यामुळे कदमांनी कितीही टीका केली, तर मी कुठलेही भाष्य करणार नाही. मुख्यमंत्र्यांनी आम्हा दोघांना चर्चेसाठी बोलावले, तर माझी तयारी आहे.