मुंबई : आदिवासी समाजातील सक्षम आणि कर्तृत्ववान महिला म्हणून शिवसेनेने भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार श्रीमती द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यावा, अशी मागणी शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. खासदार भावना गवळी यांच्यानंतर भाजपला अनुकूल अशी भूमिका घेणारे राहुल शेवाळे हे शिवसेनेचे आणखी एक खासदार आहेत.

 शेवाळे यांनी उद्धव ठाकरे यांची शिवसेना भवनात भेट घेऊन त्यांना आपले पत्र दिले. आपल्या पत्रात खासदार शेवाळे यांनी द्रौपदी मुर्मू यांच्या संवेदनशील सामाजिक कार्याची आणि यशस्वी राजकीय वाटचालीचे कौतुक केले आहे. त्यामुळे आमदारांपाठोपाठ आता शिवसेनेचे खासदारही पक्षाने भाजपशी सहकार्य करावे ही भूमिका मांडू लागल्याचे दिसत आहे. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीपाठोपाठ आता राष्ट्रपती निवडणुकीत शिवसेना खासदारांची मते विरोधात जाण्याची चिन्हे आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पक्षीय राजकारणाला छेद देत, महाराष्ट्राची कर्तृत्ववान महिला देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान व्हावी, यासाठी राष्ट्रपतीपदाच्या काँग्रेसच्या उमेदवार श्रीमती प्रतिभाताई पाटील यांना पाठिंबा दिला होता. तसेच दिवंगत माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या कर्तृत्वाचा आदर करत शिवसेनेने त्यांना पाठिंबा दर्शविला होता. हीच परंपरा कायम ठेवत शिवसेनेने मुर्मू यांना पाठिंबा द्यावा आणि त्यासाठी पक्षाच्या खासदारांना आदेश द्यावा, अशी विनंती शेवाळे यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.