अध्यापनाचा ३२ वर्षांच्या अनुभवाची अजब अट घालून शीव रुग्णालयाचे हंगामी अधिष्ठाते डॉ. सुलेमान र्मचट यांना अधिष्ठातेपदाच्या शर्यतीमधून वगळण्याचा उद्योग अंगलट येणार हे लक्षात आल्यामुळे राज्य लोकसेवा आयोगाने सोमवारी होणाऱ्या पालिका अधिष्ठातापदाच्या मुलाखतीसाठी डॉ. र्मचट यांना आमंत्रित केले आहे.
महापालिकेची केईएम, शीव आणि नायर रुग्णालये व वैद्यकीय महाविद्यालये ही मुंबईकरांची आरोग्यवाहिनी असल्यामुळे हजारो रुग्णांचे व्यवस्थापन करण्यासाठी सक्षम अधिष्ठाता असणे अत्यावश्यक आहे. मात्र पालिकेतील उच्चपदस्थांना डॉ. र्मचट यांच्यासारख्या खमक्या व्यक्तीची ‘अ‍ॅलर्जी’ असल्यामुळे लोकसेवा आयोगाकडे अधिष्ठात्यांच्या निवडीसाठी यादी पाठवताना त्यांचे नाव जाणीवपूर्वक डावलण्यात आल्याचा आक्षेप पालिका रुग्णालयातील ज्येष्ठ डॉक्टरांकडून घेण्यात येत आहे. शीव आणि नायर रुग्णालयाच्या अधिष्ठातेपदासाठी एकूण १८ डॉक्टर इच्छुक होते. त्यामुळे अंतिम यादी निश्चित करण्यासाठी काही निकष निश्चित करण्यात आले. त्यासाठी एमडी अथवा एमएस असलेल्या प्राध्यापकांसाठी शिकविण्याचा अनुभव ३२ वर्षांचा असण्याची अट घालण्यात आली. तर पदव्युत्तर सुपरस्पेशालिटी डीएनबी पदवी असलेल्यांसाठी २७ वर्षांच्या अनुभवाची अट निश्चित करण्यात आली. या अटीचा विचार करता केईएम रुग्णालयातील उपअधिष्ठाते व विख्यात शल्यविशारद डॉ. अविनाश सुपे हेसुद्धा तांत्रिक मुद्दय़ावर बाद ठरू शकतात.
वास्तविक डॉ. सुपे व डॉ. र्मचट ही वैद्यकीय अध्यापनातील दिग्गज मंडळी आहेत. डॉ. सुलेमान र्मचट हे रेडिओलॉजी विषयात नामांकित असून पालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयांमधील सर्वात ज्येष्ठ प्राध्यापक व विभागप्रमुख आहेत. याशिवाय त्यांच्याकडे अधिष्ठाता म्हणून एक वर्षांहून अधिक काळाचा अनुभव असताना त्यांना डावलण्यात आल्याच्या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, असे मतही काही डॉक्टरांनी व्यक्त केले. लोकसेवा आयोगाच्या एका अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार अधिष्ठात्याच्या एका पदासाठी मुलाखतीला आठ उमेदवार पाठवता येऊ शकतात. याचाच अर्थ दोन अधिष्ठात्यांच्या पदासाठी सोळा उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरू शकत असताना ‘शॉर्ट लिस्ट’मध्ये डॉ. र्मचट यांना अपात्र ठरविण्यामागे त्यांची निवड होऊ नये हाच हेतू आहे.
डॉ. र्मचट यांनी या अन्यायाविरोधात मुख्यमंत्री, मुख्य सचिव व पालिका आयुक्तांकडे पत्र पाठवून दाद मागितली. तसेच माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागितल्यानंतर तातडीने त्यांचे नाव मुलाखतीच्या यादीत शुक्रवारी घालण्यात आले. पालिकेतील डॉक्टरांना पालिका प्रशासनाकडून अयोग्य वागणूक मिळत असल्यामुळेच कंटाळून केईएमचे अधिष्ठाते डॉ. संजय ओक यांच्यासह अनेक वरिष्ठ डॉक्टरांनी पालिकेच्या सेवेला रामराम ठोकला आहे.