आत्ता आत्तापर्यंत प्रेमात गोंधळलेल्या युवामनांची गोष्ट हा अनेक हिंदी-मराठी चित्रपटांचा मुख्य कथाविषय राहिला आहे. प्रेम आणि लग्नाचा जोडीदार कोण? या बाबतीतला गोंधळ आणि त्यातून फुलणारं नाट्य हा यापुढेही चित्रपटकर्मींचा आवडता विषय राहणार यात शंका नाही. या प्रेमपटांच्या गर्दीत मृण्मयी देशपांडे लिखित, दिग्दर्शित ‘तू बोल ना’ या चित्रपटाचं वेगळेपण हेच की यातल्या दोन मुख्य व्यक्तिरेखा प्रेमाबाबत वा आयुष्यात त्यांना नेमकं काय करायचं आहे, याबाबत कुठेही साशंक नाहीत. फक्त आपले निर्णय प्रत्यक्षात आणण्यापूर्वी आईवडील आणि त्यांचा समाज काय म्हणेल? या भयातून येणाऱ्या वादळवाटांना ते कसं तोंड देतात आणि त्या चक्रव्यूहातून कसं बाहेर पडतात याची गोष्ट या चित्रपटात पाहायला मिळते.

‘तू बोल ना’ या चित्रपटाच्या गोष्टीपेक्षा त्यातल्या दोन मुख्य व्यक्तिरेखा फार मजेशीर आहेत. मनवा आणि श्लोक हे दोघंही एकाच वेळी अशक्य वाटणारे आणि तितकेच आपल्या निर्णयांबद्दल, मतांबद्दल आग्रही असणारे आहेत. विशेषत: मनवाची व्यक्तिरेखा नेहमीच्या ठोकळेबाज नायिकांच्या प्रतिमेपेक्षा भिन्न आहे. मनवासाठी सातत्याने स्थळं बघणं सुरू आहे, ती आलेल्या स्थळांपैकी काही विचित्र तरुणांची निवड करते, त्यांच्याबरोबर चित्रपट पाहणं, फिरणं अशा पद्धतीने संवादही साधते. मात्र, त्यांच्यापैकी एकाशीही लग्न करावंसं तिला वाटलेलं नाही. मनवाचा लग्न कसं होणार? हा तिच्या आईबाबांना जसा प्रश्न पडला आहे, तसाच प्रश्न श्लोकच्या आईला अधिक पडला आहे. आपल्या मुलाचं योग्य वयात लग्न झालं पाहिजे, तसं नाही झालं तर समाज काय म्हणेल? हा मोठा प्रश्न आहे. शिक्षण, लग्न, मुलंबाळं असा संसाराचा गाडा नीट चालला की समाजात आपल्याकडे कोणी बोटं दाखवणार नाहीत, हा एक पांढरपेशा समज रूढ आहे. मनवा आणि श्लोक दोघांचाही स्वभाव एकमेकांपेक्षा टोकाचा भिन्न आहे. मनवा आक्रमक आहे, जे मनात आहे ते तोंडावर बोलून मोकळी होणारी आहे. आपल्याला ज्या पद्धतीचं आयुष्य जगायचं आहे, ते आईवडिलांना समजावून सांगण्याचा प्रयत्न ती करते. पण त्यांना ते पटत नाही म्हणून त्यांच्या विचाराने चालणं तिला मान्य नाही, तिथे ती आपला मार्ग निवडते. त्यामुळे तिच्यासारख्या मुलींवर त्या फटकळ, उद्धट वा माणूसघाण्या वगैरे आहेत, अशाप्रकारचं लेबल लगेच डकवलं जातं. श्लोक तिच्या अगदी उलट, खूप शांत, थोडा अंतर्मुख स्वभावाचा, मनमिळावू असल्याने समोरच्यांचं म्हणणं पटलं नाही तरी ते ऐकून घ्यायला हवं या विचारांचा. आई-वडिलांचं मत चुकीचं असलं तरी ते आपले आहेत त्यामुळे त्यांना तोडणं त्याला जमत नाही. या दोघांचं मुख्य द्वंद्व हे आपल्या माणसांना आपला दृष्टिकोन कसा पटवून द्यायचा, याबाबतीतलं आहे. मनवा आणि श्लोक दोघांना एकमेकांचं स्थळ सांगून येतं. सुरुवातीला सगळं चांगलं असलं तरी ते दोघं विशेषत: मनवा लग्नाच्या निर्णयापर्यंत पोहोचत नाही. पण कुठेतरी मनवा आवडली असल्याने श्लोक तिचा पाठपुरावा करतो. अखेर, त्यांच्या प्रेमाची कथा सुफळ संपूर्ण होते का? आणि ती कशी होते? हा सगळा प्रवास ‘तू बोल ना’ यात पाहायला मिळतो.

मृण्मयी देशपांडे हिने याआधी लेखक – दिग्दर्शक म्हणून ‘मन फकिरा’सारखा उत्तम चित्रपट दिला आहे. त्यामुळे साहजिकच ‘तू बोल ना’ या तिच्या दुसऱ्या चित्रपटाकडूनही अधिक अपेक्षा होत्या. या चित्रपटात तिने दिग्दर्शन आणि अभिनय हे दुहेरी शिवधनुष्य पेललं आहे.

आधी उल्लेख केल्याप्रमाणे ‘तू बोल ना’ चित्रपटाचा कथाविषय लक्षात घेता त्यातल्या दोन व्यक्तिरेखा अधिक महत्त्वाच्या आहेत. त्यांच्याभोवती संपूर्ण चित्रपट फिरतो. आपल्याकडे तरुण पिढी कर्तबगार असणं अपेक्षित आहेच, मात्र त्यांनी त्यांच्या करिअरचे किंवा लग्नाचे निर्णय घेताना ते कुटुंबाला लक्षात घेऊन किंवा पूर्णपणे त्यांच्या विचाराने घेतले जावे अशी अपेक्षा केली जाते. त्या अर्थाने, त्यांना त्यांच्या आयुष्याचे निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य पूर्ण कधीच नसतं. त्यामुळे घरच्यांच्या अपेक्षांच्या चक्रव्यूहातून बाहेर पडणं ही लढाई सोपी राहात नाही. जे इथे मनवा आणि श्लोक दोघांच्याही बाबतीत दिसतं, पण त्यासाठी दोघांच्याही कुटुंबाची रचना करताना काहीएक ठरावीक साच्याचा मोह लेखक – दिग्दर्शिकेला आवरता आलेला नाही. मनवाचे आई-बाबा आणि आगाऊ भाऊ गोळ्या पाहताना ‘चि. व चि. सौं. का’ चित्रपटातल्या नायिकेचा भाऊ टिल्याची आठवण येते. इथे श्लोक आणि मनवा यांच्यातलं खुलत जाणं जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच या दोघांचा आईवडिलांबरोबरही संवाद होणं गरजेचं वाटतं. मात्र ते न होता, चित्रपट मध्यंतरानंतर केवळ या दोघांभोवतीच केंद्रित होतो. काही व्यक्तिरेखा आणि प्रसंगही अनावश्यक वाटतात. मृण्मयी स्वत: उत्तम अभिनेत्री आहे आणि राहुल पेठेनेही खूप अकृत्रिम पद्धतीने श्लोकची भूमिका केली आहे. अभिनयाच्या बाबतीत वरचा असलेल्या या चित्रपटातील काही कच्चे दुवे सांधता आले असते तर विषय लक्षात घेता तो अधिक उंचीवर जाऊ शकला असता.

तू बोल ना

दिग्दर्शक – मृण्मयी देशपांडे

कलाकार – मृण्मयी देशपांडे, राहुल पेठे, लीना भागवत, मंगेश कदम, उदय टिकेकर, शुभांगी गोखले, पुष्कराज चिरपुटकर, करण परब.