scorecardresearch

सीएसएमटी-पनवेल जलद लोकल बासनात? ; मेट्रो मार्गिकांमुळे उन्नत मार्गिकेच्या प्रकल्पाला बगल

सीएसएमटी ते पनवेल उन्नत जलद मार्गाला २००९-१० साली रेल्वे अर्थसंकल्पात मंजुरी मिळाली होती.

मुंबई : हार्बर मार्गावर जलद आणि झटपट प्रवासासाठी राबविल्या जाणाऱ्या सीएसएमटी ते पनवेल उन्नत जलद मार्गिका उभारण्याचा निर्णय मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (एमआरव्हीसी) रहीत केला आहे. मुंबई व परिसरात उभारण्यात येणाऱ्या मेट्रो आणि ट्रान्स हार्बर लिंक रोड प्रकल्पांमुळे उन्नत जलद मार्गिका प्रकल्प तूर्तास बाजूला ठेवण्यात येत असल्याची माहिती एमआरव्हीसीने दिली.

मुंबई व परिसरात मेट्रोचे जाळे विस्तारले जात आहे. त्यात मेट्रो ४ या वडाळा ते घाटकोपर ते ठाणे ते कासारवडवली ३२.३२ किलोमीटर मार्गिकेचाही समावेश असून त्याचे काम सुरू आहे. मुंबई उपनगरात मेट्रो रेल्वेचे सुरू असलेले प्रकल्प व भविष्यात होणारे प्रकल्प, तसेच ट्रान्स हार्बर लिंक रोड इत्यादीमुळे सीएसएमटी ते पनवेल उन्नत जलद मार्ग कितपत फायदेशीर होऊ शकतो हा चर्चेचा विषय होता. अखेर त्याला विराम मिळाला आहे. एमआरव्हीसीतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मेट्रो आणि ट्रान्स हार्बर लिंक रोड प्रकल्पांमुळे हार्बरवरील उन्नत मार्गिका प्रकल्प फायदेशीर ठरणार नाही.

प्रकल्प खर्च १२ हजार कोटी रुपये आहे. त्यात अनंत अडचणीही असल्याने तो तूर्तास तरी बाजूलाच ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे गेल्या दहा वर्षांपासून सुरू उन्नत मार्गिका प्रकल्पाच्या चर्चेला विराम मिळाला आहे.

प्रकल्पाचा प्रवास

सीएसएमटी ते पनवेल उन्नत जलद मार्गाला २००९-१० साली रेल्वे अर्थसंकल्पात मंजुरी मिळाली होती. त्यानंतर एमआरव्हीसीने याचा नव्याने प्रस्ताव बनवून रेल्वे बोर्डाकडे मंजुरीसाठी पाठविल्यानंतर २०१६ साली त्यालाही मंजुरी देण्यात आली. मात्र प्रकल्पाला स्वतंत्र मंजुरी घेऊन आणखी विलंब करण्यापेक्षा त्याचा एमयूटीपी ३ ए मध्ये समावेश केला आणि फेब्रुवारी २०१८ मध्ये पुन्हा एकदा अर्थसंकल्पात मंजुरी मिळाली. या प्रकल्पाला गती येईल, असे वाटत असतानाच एमयुटीपी  ३ ए ला मार्च २०१९ मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळानेही मंजुरी दिली, परंतु सीएसएमटी ते पनवेल उन्नत जलद मार्गिकेचा फेरआढावा घेण्याच्या सूचना एमआरव्हीसीला केल्या होत्या. फेरआढावा घेण्यापेक्षा एमआरव्हीसी खासगी भागीदारी तत्त्वावर प्रकल्प पूर्ण करण्यावरही ठाम होते. त्यातच एका खासगी कंपनीनेही प्रकल्पासाठी पुढाकार घेतला व तसा प्रस्ताव एमआरव्हीसीने पाठविला. परंतु तीन वर्षांत त्यावर विचारविनिमय झाला नाही. केंद्र सरकार, राज्य सरकार आणि एमआरव्हीसीने या प्रकल्पाबाबत उत्सुकता दाखवली नव्हती.

जलद लोकलची गरज

सध्या सीएसएमटी ते पनवेपर्यंतचा प्रवास ७५ मिनिटांचा होतो. एकंदरीतच लांबणारा प्रवास व प्रवाशांची गैरसोय पाहता या मार्गावर जलद उन्नत मार्गिका उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. प्रस्तावानुसार जलद मार्गिका उभारल्यास ७५ मिनिटांचा प्रास ४५ मिनिटात होण्याची शक्यता होती.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mrvc kept side csmt panvel elevated corridor project zws

ताज्या बातम्या