विविध ब्रँडना एफडीएकडून नोटिसा; दंड आकारणार
‘नेस्ले’च्या मॅगी नुडल्सनंतर अन्य कंपन्यांच्या नुडल्स तसेच पास्तामध्ये ‘मोनो सोडिअम ग्लुटामेट’ (एमएसजी) असल्याचे आढळून आले आहे. विशेष म्हणजे या कंपन्यांनी आपल्या ब्रँडवर ‘एमएसजी’ नसल्याचा उल्लेख केला आहे. राज्याच्या ‘अन्न व औषध प्रशासना’ने नेस्लेसह आयटीसी, चिंग्स, आला मसाला आदी ब्रँडना नोटिशी जारी केल्या असून त्यांच्याकडून दंड आकारला जाणार आहे. भविष्यात या कंपन्यांनी पुन्हा अशी चूक केल्यास त्यांच्यावर बंदी घातली जाऊ शकते, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
नेस्लेच्या मॅगी नुडल्समध्ये एमएसजीची मात्र प्रमाणापेक्षा अधिक आढळली होती. तसेच शिसेही काही प्रमाणात सापडल्यामुळे बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर बाजारातील ‘मॅगी नुडल्स’ मागे घेण्यात आले होते. अलीकडेच मॅगी न्युडल्स पुन्हा बाजारात आणण्याला हिरवा कंदिल मिळाला आहे. या पाश्र्वभूमीवर ही मॅगी बाजारात आल्यानंतर त्याची पुन्हा चाचणी होणार असल्याचे अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी स्पष्ट केले आहे. नेल्सेच्या मॅगी नुडस्ल मध्ये एमएसजीची मात्रा तसेच शिसे प्रमाणापेक्षा अधिक आढळल्यामुळे अन्न व औषध प्रशासनाने अन्य कंपन्यांच्या नुडल्स तसेच पास्ता ब्रँडची तपासणी सुरू केली होती.
या कंपन्यांनी भविष्यातील उत्पादनांमध्ये ही चूक टाळण्याचे मान्य केले आहे. याशिवाय सध्या बाजारातील साठाही मागे घेण्याचे मान्य केले आहे. त्यामुळे तूर्तास त्यांच्याविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले. या उत्पादनांमध्ये शिसाची मात्रा प्रमाणापेक्षा अधिक आढळलेली नाही. मात्र पाकिटावर जो उल्लेख केला आहे त्यापेक्षा काही अन्य बाबी आढळल्या आहेत.
नेस्लेव्यतिरिक्त वाय वाय नुडल्स, टॉप रेमेन नुडल्स, यिप्पी, फुडल्स आला मसाला तसेच नेस्लेची टोमॅटो ट्विस्ट तसेच मसाला पास्ता आदींचे राज्यातील तब्बल २७ नमुने तपासण्यासाठी घेतेले होते. यापैकी २५ नमुन्यांमध्ये एमएसजी असल्याचे आढळले. या कंपन्यांनी आपल्या ब्रँडवर एमएसजीचा अंतर्भाव नसल्याचे नमूद केले होते. त्यामुळे त्यांनी आपल्या उत्पादनाची खोटी जाहीरात केल्याचे स्पष्ट झाल्याने अन्न सुरक्षा आणि दर्जा कायदा २००६ नुसार उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाल्याने या कंपन्यांना नोटिशा देण्यात आल्या आहेत. या ब्रँडपैकी वाय वाय आणि टॉप रेमन नुडल्स यामध्ये एमएसजीचे प्रमाण मर्यादेत असल्याचे आढळून आल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले.