एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन मागे ; २८ टक्के महागाई भत्ता देण्याचा निर्णय

रुवारी या आंदोलनाला अघोषित संपाचे स्वरूप आले. राज्यातील एसटी कामगार मोठय़ा संख्येने आंदोलनात सहभागी झाले.

मुंबई : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच २८ टक्के महागाई भत्त्यासह अन्य मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी बुधवारपासून सुरू केलेले बेमुदत उपोषण गुरुवारी रात्री मागे घेतले. महागाई भत्त्याबरोबरच काही मागण्या मान्य झाल्याने एसटी कर्मचारी संयुक्त कृती समितीने हा निर्णय घेतला. मात्र, उपोषणाचे रूपांतर अघोषित संपात झाल्याने गुरुवारी एसटी प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.

एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे राज्यातील २५० पैकी १९० आगार पूर्णत: बंद झाले होते. त्यामुळे एसटीचे वेळापत्रक कोलमडले. एसटी महामंडळ आणि एसटी कर्मचारी संयुक्त कृती समिती यांच्यात गुरुवारी बैठक झाली. त्यात एसटी कर्मचाऱ्यांना २८ टक्के  महागाई भत्ता, घरभाडे भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला. त्यामुळे आंदोलन मागे घेण्यात आल्याचे कामगार संघटनांच्या कृती समितीने जाहीर केले. एसटी महामंडळाने कामगारांच्या महागाई भत्त्यात नुकतीच पाच टक्के  वाढ के ली होती. त्यामुळे महागाई भत्ता १२ टक्क्यांवरून १७ टक्के  झाला. परंतु, ही वाढ फक्त ५०० ते ६०० रुपयांचीच होती. त्यातच कर्मचाऱ्यांसाठी अडीच हजार रुपये दिवाळी भेटची घोषणा करण्यात आली तरी घरभाडे भत्त्यासह अन्य आर्थिक लाभांवर महामंडळाने निर्णय घेतला नव्हता. त्यामुळे बुधवारपासून एसटी महामंडळातील सर्व कामगार संघटनांनी बेमुदत उपोषणाला सुरुवात के ली. यासंदर्भात परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांच्याशी संघटनांची झालेली चर्चाही फिसकटली होती.

 गुरुवारी या आंदोलनाला अघोषित संपाचे स्वरूप आले. राज्यातील एसटी कामगार मोठय़ा संख्येने आंदोलनात सहभागी झाले. गुरुवारी सकाळपासून एसटी सेवा ठप्प होण्यास सुरुवात झाली.   कामानिमित्त बाहेर पडलेल्यांना त्याचा फटका बसला. दिवाळी सुट्टीनिमित्त बाहेरगावी जाण्यासाठी एसटीचे आरक्षण के लेल्या प्रवाशांनाही मनस्ताप झाला. सकाळी १० वाजेपर्यंत राज्यातील २५० आगारांपैकी १०० एसटी आगार बंद झाले. दुपारनंतर ही संख्या १९० पर्यंत गेली, तर ७२ आगार अंशत: सुरू होते. मुंबई, नागपूर, भंडारा, गडचिरोली विभागात काही प्रमाणात एसटी धावत होत्या. मात्र, त्यांची संख्या कमी होती. परिणामी प्रचंड गर्दी झाली होती.

एसटी कामगारांच्या मागण्यांवर तोडगा काढण्याचे प्रयत्न महामंडळाकडून सुरु होते. परिवहन मंत्री अनिल परब, एसटी महामंडळ अधिकारी व एसटी कामगार संघटनाच्या कृती समितीशी चर्चा सुरु होती. अखेर गुरुवारी रात्री यावर तोडगा निघाला. एसटी कामगारांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे २८ टक्के  महागाई भत्त्यासह घरभाडे भत्ता वाढवून देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती अनिल परब यांनी दिली. अन्य मागण्यांवर दिवाळीनंतर तोडगा काढला जाईल, असे आश्वासनही दिले. त्यामुळे एसटी कामगार कृती समितीने संप मागे घेतला. शुक्र वारी एसटी सेवा पूर्ववत होईल, अशी माहिती महामंडळाने दिली.

अन्य सेवांवर ताण

मुंबई, ठाणे व महानगरातील अन्य भागांत गुरुवारी सकाळी ११ वाजेपर्यंत काही प्रमाणात एसटी सेवा सुरू होती. त्यानंतर या आंदोलनाचा मुंबई महानगरातही परिणाम जाणवू लागला. एक लसमात्रारकांना लोकल प्रवासास परवानगी नसल्याने आणि एसटीही बंद झाल्याने प्रवाशांपुढे अन्य परिवहन सेवांशिवाय पर्याय उरला नव्हता. त्यामुळे पालिकांच्या परिवहन सेवांच्या थांब्यावर मोठी गर्दी होती.

एसटी कामगारांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली असून, ती नोव्हेंबरपासून लागू होईल. घरभाडय़ातही वाढ करण्यात आली आहे. वेतन व अन्य खर्चासाठी राज्य शासनाकडे निधी मागणार आहोत. 

      – शेखर चन्न्ो, व्यवस्थापकीय संचालक, एसटी महामंडळ

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Msrtc employee end hunger strike after demand meet zws

Next Story
केरोसीन अनुदानाचे वितरण बँक खात्यांच्या माध्यमातून- अनिल देशमुख
ताज्या बातम्या