मुंबई: राज्य परिवहन महामंडळात चालक व वाहक हे पद नव्याने निर्माण करण्यात आली आहेत. त्यामुळे चालक पदात अतिरिक्त कर्मचारी झाले आहेत. चालक व वाहक या दोन्ही पदातील ५००० कर्मचाऱ्यांना त्याचा फटका बसला आहे. या कर्मचाऱ्यांना मंजुरी अभावी दहा वर्षे हंगामी वेतन श्रेणीत काम करावे लागत असल्याने त्यांची आर्थिक पिळवणूक होत असल्याचा आरोप महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसने केला आहे.
या संदर्भात एक निवेदन परिवहन मंत्री व एसटीचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांना देण्यात आले असून चालक व वाहक या पदातील कर्मचाऱ्यांची पदे वेगवेगळी न दाखवता दोन्ही पदांचे एकत्रीकरण करण्यात आल्यास हा प्रश्न सुटू शकेल असेही संघटनेने निवेदनात म्हटले आहे.
एसटीच्या स्थापने पासून चालक व वाहक या पदासाठी वेगवेगळी भरती केली जाते. सन २०१६ मध्ये वाहक हे पद गोठविण्यात आले. त्यानंतर चालक तथा वाहक हे एकत्रित पद निर्माण करण्यात आले आहे. हे नवीन पद निर्माण करण्यात आल्या नंतर ते चालकाच्या मंजुरीत समाविष्ट करण्यात आल्याने त्याचा फटका ५००० चालक व वाहक कर्मचाऱ्यांना बसला आहे. चालकाच्या मंजुरीत वाहक समाविष्ट करण्यात आल्याने चालक पदात अतिरिक्त कर्मचारी झाले आहे. चालक व वाहक या दोन्ही पदाचे एकत्रीकरण करण्यात आल्यास हा प्रश्न सुटू शकेल असे संघटनेचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी म्हटले आहे.