मुंबई : राज्यात अतिवृष्टीमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा आपत्तीच्या काळात एसटीच्या आगारातील आगार व्यवस्थापक कर्तव्यावर हजर नव्हते. एसटी महामंडळाच्या २५१ पैकी ३४ आगारांतील गैरहजर असलेल्या आगार व्यवस्थापकांवर कारवाई करण्यात येणार आहे. एसटीच्या ठाणे, पालघर, रत्निगिरी, सातारा, सांगली, सोलापूर, नाशिक, जळगाव, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, जालना, लातूर, परभणी, भंडारा, वर्धा या विभागांतील आगारामधील आगार व्यवस्थापक मुख्यालयात नसल्याची माहिती समोर आली आहे.
गेल्या काही दिवसापासून राज्यभरात परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. विशेषतः मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाल्याने अनेक रस्ते बंद आहेत. पुलावर पाणी आले आहे. अशा परिस्थितीमध्ये एसटीची वाहतूक अनेक ठिकाणी ठप्प झाली. अनेक प्रवासी बसस्थानकावर अडकून पडले. अशा गंभीर परिस्थितीमध्ये मुख्यालयात हजर राहून जबाबदारीने कर्तव्य पार पाडण्याऐवजी काही आगार व्यवस्थापक कर्तव्यावर गैरहजर असल्याचे दिसून आले आहे.
या आगार व्यवस्थापकांनी परिस्थितीचे गांभीर्य न ओळखता अत्यंत बेजबाबदार वर्तन केले आहे. अशाप्रकारे कर्तव्यात कसूर करणाऱ्या आगार व्यवस्थापकांना संबंधित प्रादेशिक व्यवस्थापक यांनी कारणे दाखवा नोटीस तातडीने बजावली पाहिजे. त्यामध्ये त्यांचा खुलासा समाधानकारक नसल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. तसेच हे आगार व्यवस्थापक ज्या विभाग नियंत्रकांच्या अखत्यारित काम करतात, त्या विभाग नियंत्रकांना देखील याबाबत विचारणा केली जाईल, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.
आगार व्यवस्थापक हा एसटी प्रशासनाचा मुख्य घटक आहे. त्याच्या अंतर्गत शेकडो कर्मचारी काम करत असतात. आगार व्यवस्थापक ज्या आगारात कार्यरत असतो, तेथे अनेक बस रात्रपाळीला मुक्कामी असतात. तसेच, लाखो रुपये किमतीचे ऑइल, इंधन व इतर सुटे भाग तिथे असतात. याबरोबरच तिकीट विक्रीमधून आलेली मोठी रक्कम आगारात ठेवण्यात आलेली असते.
अशा परिस्थितीमध्ये एक पालक म्हणून आगार व्यवस्थापकावर मोठी जबाबदारी असते. त्याने आगारात दररोज उपस्थित राहून या सर्वांना मार्गदर्शन करणे आवश्यक असते. परंतु काही आगारप्रमुख हे आगारात उपस्थित नसल्याचे सुरक्षा व दक्षता खात्याच्या गोपनीय अहवालात स्पष्ट झाले. कर्तव्यात कसूर करून बेजबाबदार वर्तन करणाऱ्या अशा आगार व्यवस्थापकांवर प्रशासन लवकरच कारवाई करेल, यापुढे अशा प्रकारच्या घटना घडणार नाहीत याची दक्षता एसटी महामंडळाने घ्यावी, असे निर्देश प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत.
एसटीच्या ठाणे विभागातील शहापूर, मुरबाड, भिवंडी, विठ्ठलवाडी, वाडा; पालघर विभागातील सफाळा, वसई; रायगड विभागातील पेण, कर्जत; रत्नागिरी विभागातील खेड; सातारा विभागातील कोरेगाव, पाटण, मेढा, वडूज; सांगली विभागातील तासगाव, कवठेमहांकाळ, पलूस; सोलापूर विभागातील अक्कलकोट; नाशिक विभागातील इगतपुरी, लासलगाव; जळगाव विभागातील अमळनेर; अमरावती विभागातील चांदुरबाजार, मोर्शी; अकोला विभागातील अकोला एक, अकोट; बुलढाणा विभागातील खामगाव, शेगाव, जळगाव जामोद; यवतमाळ विभागातील वणी; जालना विभागातील अंबड; लातूर विभागातील अहमदपूर; परभणी विभागातील वसमत; भंडारा विभागातील गोंदिया आणि वर्धा विभागातील तळेगाव येथील आगार व्यवस्थापक मुख्यालयात नसल्याची माहिती समोर आली आहे.