सीमाभागांत पाकिस्तान आणि चीनकडून सुरू असलेल्या घुसखोरीच्या मुद्दय़ाने देशातील राजकीय वातावरण तापले असतानाच भारतीय दळणवळण खात्याच्या ‘एमटीएनएल मुंबई’ या संकेतस्थळातही पाकिस्तानी घुसखोरी झाली असून हॅकर्सनी ‘पाकिस्तानचा स्वातंत्र्यदिन चिरायु होवो’, असा संदेश तेथे फडकवल्याने सरकारी यंत्रणेला हादरा बसला आहे. ऑस्ट्रेलियातून हे संकेतस्थळ हॅक झाल्याचा तर्क आहे. फेसबुकवर ‘मिस्टर क्रीपी’ नावाच्या हॅकरने मुंबई एमटीएनएलसह आपण पुणे वाहतूक पोलिसांचे संकेतस्थळही हॅक केल्याचा दावा केला आहे.
आपले संकेतस्थळ पूर्ववत झाल्याचा दावा एमटीएनएलने केला असला तरी आपल्याला या संकेतस्थळावर जाण्यात अडचणी येत असल्याची अनेक ग्राहकांची तक्रार आहे. ग्राहकांनी आपल्या संकेतस्थळाचे होमपेज रिफ्रेश करावे नाही तर त्यांना जुनेच अर्थात हॅकर्सनी बदललेले होमपेज दिसेल, असे एमटीएनएलच्या प्रवक्त्याने सांगितले.