मुंबई : न्यायालयाच्या आदेशानंतर मुंबईतील भटक्या कुत्र्यांवर अत्यंत घाई घाईने व अन्यायकारक कारवाई करण्यात येत आहे. त्यांना मुलुंड येथे सोडण्यात येत असून जोपर्यंत निवारागृहे उभारण्यात येत नाहीत तोपर्यंत कारवाई थांबवावी अशी मागणी युवक काँग्रेसकडून करण्यात आली आहे. याविरोधात शिवाजी पार्क परिसरात मुंबई युवक काँग्रेस आणि प्राणीमित्र संघटनांच्या वतीने निदर्शने करण्यात आली.

मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांच्या नेतृत्त्वाखाली मुंबई युवक काँग्रेसचे पदाधिकारी आणि प्राणीमित्र संघटनांच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने करीत शिवाजी पार्क परिसरात भटक्या कुत्र्यांविरोधात सुरू असलेल्या कारवाईचा निषेध केला. यावेळी बोलताना झीनत शबरीन यांनी भटक्या प्राण्यांना स्वतःसाठी आवाज उठवता येत नाही. त्यांच्याशी क्रूरता करणे योग्य नसल्याचे मत मांडले. यावेळी जबाबदार नागरिक म्हणून मानवता, करुणा आणि न्याय या मूल्यांचे रक्षण करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.

भटक्या कुत्र्यांना हटवण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा आधार घेत मुंबईत कारवाई सुरू झाली आहे; परंतु हा आदेश अत्यंत व्यापक असून, त्याच्या अंमलबजावणीसाठी योग्य यंत्रणा, निवारागृहे, वैद्यकीय सुविधा आणि प्राणी प्रजनन नियंत्रण (ॲनिमल बर्थ कंट्रोल) कार्यक्रम तयार करायला हवा. पण पर्यायी व्यवस्था उभी न करता कारवाई करणे अमानवी, अव्यवहार्य आणि अन्यायकारक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

राहुल गांधी यांनी वोटचोरीचा मुद्दा मांडला की लगेचच अशा कारवाया करून महत्वाच्या मुद्द्यावरून लक्ष दुसरीकडे वळविण्याचा प्रयत्न सुरु होतो. जसे दादरमध्ये कबूतर खान्याच्या विषयावर पर्यायी व्यवस्था शोधण्यात आली, तसेच भटक्या कुत्र्यांसाठीही सरकारने पर्याय उपलब्ध करणे आवश्यक आहे. हे प्राणीही या शहराचा एक भाग आहेत; त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे. मुंबई युवक काँग्रेस प्राणीप्रेमी, प्राण्यांच्या हक्कांसाठी कार्य करणाऱ्या संघटना आणि संवेदनशील मुंबईकरांच्या पाठीशी ठाम उभी आहे, असे शबरीन म्हणाल्या.