मुंबई : मुंबईकरांची तहान भागविणाऱ्या सातही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची रिमझीम सुरू असून तानसा आणि मोडकसागर यापूर्वीच ओसंडून वाहू लागले आहेत. सातही धरणांमधील पाणीसाठा आजघडीला ८८.३८ टक्क्यांवर पोहोचला असून मागील दोन वर्षांच्या तुलनेत पाणीसाठा अधिक आहे. भविष्यात धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस मुक्कामी राहिल्यास लवकर उर्वरित धरणे ओसंडून वाहू लागतील.
मुंबईकरांना उर्ध्व वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सात धरणांमध्ये प्रतिदिन ३९०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो. मार्च-एप्रिलमध्ये सातही धरणांनी तळ गाठायला सुरुवात केली होती. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या जलअभियंता विभाग चिंतीत झाला होता. मात्र पावसाने मेमध्ये दमदार हजेरी लावली आणि धरणांतील पाणीसाठ्यात सुधारणा होऊ लागली.
मे, जून आणि जुलैमध्ये कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे उर्ध्व वैतरणातून ५ जुलै रोजी पाण्याचा विसर्ग सुरू करावा लागला. तर ७ जुलै रोजी मध्य वैतरणाचे दार क्रमांक १ आणि ५ खुले करावे लागले. तर मोडकसागर ९ जुलै रोजी, तर तानसा २३ जुलै रोजी ओसंडून वाहू लागले. मुंबईकरांना सर्वाधिक पाणीपुरवठा भातसा धरणातून करण्यात येते. भातसा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यामुळे २५ जुलै रोजी धरणाचे पाचही दारवाजे २५ सेमीने उघडून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला.
सातही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची रिमझिम सुरू आहे. जलअभियंता विभागाकडून उपलब्ध झालेल्या २९ जुलै रोजी सकाळी ६ च्या नोंदीनुसार उर्ध वैतरणामध्ये ३७ मिमी, मोडकसागरमध्ये ३८ मिमी, तानसामध्ये १६ मिमी, मध्य वैतरणामध्ये ४० मिमी, भातसामध्ये २२ मिमी, विहारमध्ये ६ मिमी, तुलशीमध्ये ३५ मिमी. पावसाची नोंद झाली. या सातही धरणांमधील वापरायोग्य पाण्याची पातळी अनुक्रमे ८१.८९, १०० टक्के, ९८.४१ टक्के, ९५.९५ टक्के, ८५ टक्के, ७१.०९ टक्के आणि ८०.२७ टक्के इतकी आहे.
सातही धरणांमध्ये आजघडीला ८८.३८ टक्के म्हणजे १२ लाख ७९ हजार १७९ दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध आहे. मागील वर्षी (२०२४) याच दिवशी धरणांमध्ये ७३.७७ टक्के म्हणजेच १० लाख ६७ हजार ७०३ दशलक्ष लिटर, तर २०२३ मध्ये याच दिवशी ७१.८४ टक्के म्हणजे १० लाख ३९ हजार ८२५ दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध होता. सातही धरणांची पाणीसाठवण क्षमता १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर इतकी आहे.
धरणांची साठवण क्षमता आणि उपब्ध पाणीसाठी (मीटर्समध्ये)
धरण | साठवण क्षमता (मीटरमध्ये) | उपलब्ध पाणी (दशलक्ष लिटरमध्ये) |
उर्ध्व वैतरणा | ६०३.५१ | १,८५,९२० |
मोडकसागर | १६३.१५ | १,००,६८६ |
तानसा | १२८.६३ | १,४२,७६९ |
मध्य वैतरणा | २८५.०० | १,८५,६८९ |
भातसा | १४२.०७ | ६,०९,७२७ |
विहार | ८०.१२ | १९,६९१ |
तुळशी | १३९.१७ | ६,४५८ |