मुंबई पोलीस दलातील गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी कक्षाकडून कारवाईचे सत्र सुरू आहे. जून महिन्यात अमली पदार्थ विरोधी कक्षाने ८३ गुन्हे दाखल केले असून ९९ जणांना अटक केली आहे. या गुन्ह्यात सुमारे ६.७० कोटींचे एकूण ११३ किलो ११६ ग्रॅम अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.

मुंबईत रस्ते, जल, विमान, रेल्वे मार्गाने अमली पदार्थाची तस्करी केली जाते. तस्करांचे जाळे खूप मोठे आहे. मात्र, अमली पदार्थांची खरेदी-विक्री रोखण्यासाठी आणि अमली पदार्थांचे तस्कर पकडण्यासाठी वारंवार कारवाई केली जाते. मुंबईतील शहर आणि उपनगरांतील विविध भागात पोलिसांनी कारवाई केली असून तस्करांना पकडण्यात यश आले आहे. अमली पदार्थांच्या आहारी तरूणाई जाऊ नये यादृष्टीने गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने गांजा आणि एम.डी ड्रग्स तस्करांच्या विरोधात मोहीम सुरू केली आहे. जून महिन्यात एकूण ८३ गुन्हे दाखल करण्यात आले असून ९९ जणांना अटक केली आहे.

१९ लाख २७ हजार रुपयांचा गांजा जप्त –

जून महिन्यात १०४ किलो ४४० ग्रॅम गांजा जप्त करण्यात पथकाला यश आले आहे. या गांज्याची किंमत १९ लाख २७ हजार रुपये आहे. ५ लाख ७९ हजार रुपयांचे ९४६ ग्रॅम चरस, ६ कोटी ३८ लाख २७ हजार रुपयांचे ४ किलो ६२६ ग्रॅम मेफेड्रॉन (एमडी), ९० हजार रुपयांचे १८ ग्रॅम हेरॉईन आणि ४ लाख ६१ हजार रुपयांचे २ किलो ९२४ ग्रॅम असे अमली पदार्थ पथकाने जप्त केले आहेत, अशी माहिती गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी कक्षाने दिली.