मुंबई : भांडुप येथील एलबीएस मार्गावरील आयुषमान रुग्णालयासमोरील मंगळवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास रस्त्यावरील फीडर पिलरमध्ये शॉर्ट सर्किट होऊन विजेचा धक्का बसल्याने तरुणाचा मृत्यू झाला. दिपक अजय रामलिंगम पिल्लाई (१७) असे मृत तरुणाचे नाव आहे.

मंगळवारी पहाटेपासून कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईतील अनेक रस्ते जलमय झाले होते. त्यातच भांडूपमधील पन्नालाल कंपाऊंडनजीकचा एलबीएस मार्गही पाण्याखाली गेला होता.

मुसळधार पावसामुळे रस्त्यावरील फीडर पिलरमध्ये शॉर्ट सर्किट झाले. त्यावेळी साचलेल्या पाण्यातून वाट काढत चालणाऱ्या दिपक पिल्लाई या तरुणाला विजेचा जबर धक्का बसला आणि तो खाली कोसळला.

काही मिनिटे तरुण पाण्यातच पडून होता. त्यानंतर, स्थानिकांनी तात्काळ त्याला पाण्याबाहेर काढले आणि उपचारासाठी नजीकच्या आयुषमान रूग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.