गणेशोत्सव अवघ्या सहा दिवसांवर आला असून मुंबई महानगरपालिकेकडे रस्त्यावर मंडप उभारण्यासाठी यंदा २७३२ अर्ज आले आहेत. अर्ज करण्याची २३ ऑगस्टपर्यंत मुदत होती. मुदतीच्या अखेरच्या दिवशी १,९४७ मंडळांना मंडप परवानगी देण्यात आली. तर ४१५ मंडळांना परवानगी नाकारण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दोन वर्षांनंतर यंदा गणेशोत्सव निर्बंधामुक्त वातावरणात साजरा होत असून मुंबई महानगरपालिकेकडे मंडप परवानगीसाठी ३,२५५ अर्ज आले होते. यंदा करोना व टाळेबंदीचे सावट नसल्यामुळे करोनापूर्वकाळाप्रमाणेच गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. ३१ ऑगस्टला गणेशचतुर्थी असून मुंबई महानगरपालिकेने सार्वजनिक मंडळांना मंडप परवानगी देण्याची प्रक्रिया सुरू केली होती. यासाठी ४ जुलैपासून एक खिडकी योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत मुंबई महानगरपालिकेकडे आलेल्या अर्जांपैकी ५२३ अर्ज दुबार आहेत. त्यामुळे उर्वरित २७३२ अर्जांची छाननी करण्यात आली असून त्यापैकी १९४७ अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. तर ४१५ अर्ज नाकारण्यात आले आहेत. तर ३७० अर्ज हे अद्याप प्रक्रियेत असल्याची माहिती उपायुक्त हर्षद काळे यांनी दिली.

गणेशोत्सवासाठी कोकणात जाताय, प्रवासासाठी मोजावे लागणार २ हजार २०० रुपये

मुंबई महानगरपालिकेने मंडप उभारण्यासाठी पूर्वीप्रमाणे नियम जाहीर केले आहेत. मंडपांची उंची ३० फूटांपेक्षा अधिक नसावी, तसेच २५ फूटांपेक्षा अधिक उंची असलेल्या मंडपांच्या बांधणी स्थैर्यतेची अर्थात मजबूतीची हमी मंडळांना द्यावी लागेल. त्यासाठी मंडळास जबाबदार धरण्यात येईल, असे मुंबई महानगरपालिकेने स्पष्ट केले आहे. नव्या मंडळाला गणेशोत्सवासाठी जागा हवी असल्यास स्थानिक पोलीस ठाणे, सहाय्यक पोलीस आयुक्त आणि मुंबई महानगरपालिकेच्या उपायुक्तांची मान्यता घ्यावी लागणार आहे.

रस्त्यावर खड्डे पाडल्यास प्रति खड्डा २००० रुपये दंड –

नव्या नियमावलीनुसार गणेश मंडळांकडून मंडपांच्या परवानगीसाठी घेण्यात येणारे १०० रुपये शुल्क माफ करण्यात आले आहे. यंदा हे शुल्क कोणीही भरले असल्यास त्यांना ते परत करण्यात येईल. तसेच जाहिरातींवर दोनशे ते अडीचशे रुपये परवाना शुल्क घेतले जाते, तेदेखील माफ करण्यात आले आहे. मात्र मंडप उभारताना रस्त्यावर खड्डे खोदू नये, अशी सूचना मुंबई महानगरपालिकेने केली आहे. उत्सवस्थळी मंडपासाठी खड्डे खोदल्याचे निदर्शनास आल्पयास प्रति खड्डा २००० रुपये दंड वसूल करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai 2732 applications till last day for mandap in ganeshotsav mumbai print news msr
First published on: 24-08-2022 at 13:26 IST