मुंबई : वरळी – शिवडी उन्नत रस्त्याअंतर्गत बांधण्यात येत असलेल्या प्रभादेवी दुमजलीय पुलाच्या कामात बाधित होणाऱ्या ८३ कुटुंबांना म्हाडाची परळ, प्रभादेवी, माटुंगा परिसरातील घरे देण्यात येणार आहेत. म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाने ११९ घरे शोधून त्याची यादी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (एमएमआरडीए) दिली होती. या ११९ घरांपैकी ८३ घरे एमएमआरडीएने निश्चित केली असून लवकरच या घरांबाबत अंतिम निर्णय घेऊन ती बाधितांना वितरीत करण्यात येणार आहेत. म्हाडाकडून मिळणाऱ्या या घरांसाठी एमएमआरडीएला ९८ कोटी रुपये द्यावे लागणार आहेत.

दक्षिण मुंबईतून, वरळीतून अटल सेतूवर जलद पोहोचता यावे यासाठी एमएमआरडीए वरळी-शिवडी उन्नत रस्ता बांधत आहे. हा उन्नत रस्ता प्रभादेवी पुलावरून जात असून हा पूल जुना आणि धोकादायक झाल्याने त्यावरून पूल नेताना जुन्या पुलाचे काय होणार असा प्रश्न निर्माण झाला होता. अखेर एमएमआरडीएने जुना पूल पाडून त्या जागी नवीन दुमजली पूल बांधण्याचा निर्णय घेतला आणि त्यास मान्यता घेतली. मात्र या दुमजली पुलाच्या कामात आधी १९ आणि त्यानंतर संरेखनात बदल केल्यानंतर दोन इमारती बाधित होत आहेत.

या बाधित कुटुंबाच्या पुनर्वसनचा मुद्दा वादग्रस्त ठरल्याने दुमजली पुलाचे काम सुरू होण्यास मोठा विलंब झाला आहे. पण अखेर आता बाधित ८३ कुटुंबांना प्रभादेवी – मांटुगादरम्यानच्या परिसरात म्हाडाच्या दुरुस्ती मंडळाला अतिरिक्त क्षेत्रफळाद्वारे उपलब्ध झालेली घरे देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यानुसार दुरुस्ती मंडळाने परळ, प्रभादेवी ते मांटुगादरम्यानची ११९ घरे शोधून त्याची यादी एमएमआरडीएकडे सुपूर्द केली होती. या यादीतील ८३ घरे एमएमआरडीएने निश्चित केली आहेत, पण घरांबाबतचा अंतिम निर्णय अद्याप दुरुस्ती मंडळाला कळवण्यात आलेला नाही, अशी माहिती दुरुस्ती मंडळातील अधिकाऱ्यांनी दिली. एमएमआरडीए लवकरच याबाबतचा निर्णय घेणार असून घरे बाधितांना वितरीत केली जाण्याची शक्यता आहे.

लोकमान्य नगर प्रियदर्शनी (दादर), एस.के.बोले मार्ग, श्नीनिवास टाॅवर (लोअर परळ), पिनॅकल बिल्डींग (काळाचौकी), आनंद हाटस (अँटाॅप हिल), दादासाहेब फाळके मार्ग, खेडगल्ली, उमा निवास (माटुंगा), लक्ष्मी बिल्डींग (ना. म. जोशी मार्ग), बदानी बोहरी चाळ (परळ), पारसमणी सीएचएस (दादर), शीतला देवी मंदिर मार्ग, बेलासिस रोड आणि नेस्बिस्ट रोड या ठिकाणी ही घरे आहेत. ही घरे ३०० ते ७५० चौरस फुटांची आहेत. म्हाडाच्या किंमतीच्या धोरणानुसार या घरांसाठी किंमत आकारून ती एमएमआरडीएला दिली जाणार आहेत. त्यानुसार ही रक्कम ९८ कोटी रुपयांच्या घरात असल्याची माहिती दुरुस्ती मंडळातील अधिकाऱ्यांनी दिली. या घरांसाठी एमएमआरडीएला ९८ कोटी रुपये मोजावे लागणार आहेत.