मुंबईः तक्रारीबाबत कारवाई करण्यासाठी दोन लाख रुपयांची लाच स्वीकारल्याच्या आरोपखाली सहकारी अधिकारी विकास रामचंद्र कोरडे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने(एसीबी) अटक केली आहे. आरोपीने तक्रारीबाबत कारवाई करण्यासाठी चार लाख रुपयांची लाच मागितली होती. पण लाचेचा पहिला हफ्ता स्वीकारताना त्यांना अटक करण्यात आली. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अधिक तपास करत आहे.
याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार याप्रकरातील तक्रारदार हे एका गृहनिर्माण सोसायटीचे खजिनदार होते. त्यांनी संबंधीत सोसायटीच्या सचिवाला बेकायदेशीर कामाबाबत जाब विचारला होता. त्यानंतर तक्रारदार यांना खजिनदार या पदावर काढून टाकले होते. तक्रारदार यांनी त्यांना कमिटीतून काढून टाकणे, नविन सदस्यांची नेमणूक करणे तसेच त्यांची सोसायटीची कमिटी ही बेकायदेशीर कामे करीत असून सोसायटी कायदयाप्रमाणे काम करीत नसल्याची तक्रार करण्याचा निर्णय घेतला. तसेच संबंधीत सोसायटी कमिटी रद्द करण्याबाबत तक्रार अर्ज उपनिबंधक सहकारी संस्था, ‘के’ पश्चिम विभाग, वांद्रे (पुर्व), मुंबई येथे केला होता. त्याअनुषंगाने संबंधीत कार्यालयाने तक्रारदार यांना पुन्हा कमिटीवर घेण्याबाबत आदेश पारित केला होता.
परंतु नमूद गृहनिर्माण सोसायटीचे सचिव व सोसायटी यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे तक्रारदार यांनी कमिटीवर कारवाई करण्यासाठी संबंधीत उप निबंधक, सहकारी संस्था, के पश्चिम विभाग, मुंबई या कार्यालयात जाऊन याबाबत चौकशी केली केली. त्यावेळी विकास कोरडे यांच्यासह आणखी एका अधिकाऱ्यांने तक्रारदार यांच्या तक्रार अर्जावर कारवाई करण्याकरीता चार लाख रुपये लाचेची मागमी केली. पण तक्रारदार यांची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार २४ मे रोजी तक्रार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या मुंबई कार्यालयात याबाबत लेखी तक्रार केली.
त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २८ मे रोजी या तक्रारीची पडताळणी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार तक्रारदार यांच्याकडे चार लाख रुपयांची लाचेची मागणी केल्याचे व दोन लाख रुपये मागितल्याचे निष्पन्न झाले. अखेर याप्रकरणी सापळा रचून दोन लाखांची लाच स्वीकारताना कोरडे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. त्यांच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ कलम ७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला न्यायालयाने दोन दिवस पोलीस कोठडीत सुनावल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.