मुंबई :अभिनेता सैफ अली खान याच्या वांद्रे येथील घरात घुसून त्याच्यावर चाकूचे वार केल्याच्या आरोपाप्रकरणी अटकेत असलेला बांगलादेशी नागरिक मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद याने शुक्रवारी वांद्रे येथील दंडाधिकारी न्यायालयात नव्याने जामिनासाठी अर्ज केला आहे. तसेच, त्याची अटक बेकायदा ठरवून त्याच्या सुटकेचे आदेश देण्याची मागणी केली.

शरीफुल सध्या आर्थर मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त आहे. त्याने आधी एप्रिल महिन्यात सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. तथापि, शुक्रवारी त्याने हा अर्ज मागे घेतला आणि वांद्रे दंडाधिकाऱ्यांकडे नव्याने अर्ज केला. आपल्याला अटक करताना योग्य कायदेशीर प्रक्रियेचे पालन केले गेले नाही. त्यामुळे, आपली अटक बेकायदा ठरवावी आणि आपल्या सुटकेचे आदेश द्यावेत, अशी मागणी शरीफुल याने या अर्जाद्वारे न्यायालयाकडे केली आहे. न्यायालयाने त्याच्या अर्जाची दखल घेऊन त्यावर पोलिसांना १३ मेपर्यंत उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी काही दिवसांपूर्वी आरोपपत्र दाखल केले होते. त्या पार्श्वभूमीवर शरीफुल याने जामिनासाठी अर्ज केला आहे.

प्रकरण काय ?

जानेवारी महिन्यात सैफ याच्या वांद्रे येथील घरात शरीफुल चोरीच्या उद्देशाने घुसला होता. त्यावेळी सैफ याने त्याला अडवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी शरीफुल याने सैफ याच्यावर चाकूने वार केले आणि तेथून पलायन केले. या हल्ल्यात सेफ गंभीर जखमी झाला आणि त्याला लीलावती रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्याच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. हल्ल्याच्या दोन दिवसांनंतर पोलिसांनी शरीफुल याला अटक केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तथापि, शरीफुल याला केलेली अटक चुकीची असल्याचा दावा त्याच्या वडिलांनी केला होता. तसेच, सेफ वास्तव्यास असलेल्या इमारतीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांत दिसणारा आरोपी हा आपला मुलगा नसल्याचा दावा देखील शरीफुल याच्या वडिलांना केली होता. पोलिसांनी मात्र न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या अहवालाचा दाखला देऊन शरीफुल याच्या वडिलांच्या आरोपांचे खंडन केले होते व शरीफुल हाच सैफ याच्या घरात घुसल्याचे म्हटले होते.