मुंबई : पदव्युत्तर दंत अभ्यासक्रमाच्या पहिल्या फेरीची प्रवेश प्रक्रिया १३ जुलै रोजी संपल्यानंतर आता दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार २५ जुलैपासून दुसऱ्या फेरीसाठी ऑनलाईन पसंतीक्रम भरता येणार आहे.
पदव्युत्तर दंत अभ्यासक्रमाच्या पहिल्या फेरीमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश रद्द करण्यासाठी २३ जुलै रोजी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर २४ जुलै रोजी राज्यातील रिक्त जागांचा तपशील जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर दुसऱ्या फेरीसाठी २५ ते २७ जुलै या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांना महाविद्यालयांचा पसंतीक्रम भरण्यासाठी मुदत देण्यात आली आहे.
२९ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजल्यानंतर दुसऱ्या फेरीसाठीची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे. गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना ३० जुलै ते ३ ऑगस्ट या कालावधीमध्ये प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश घ्यायचा आहे. पदव्युत्तर दंत अभ्याक्रमासाठी २८ जूनपासून राज्य कोट्यांतर्गत प्रवेश प्रक्रियेला सुरूवात झाली. पहिली फेरी १३ जुलै रोजी संपल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेश रद्द करण्यासाठीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.