मुंबईः मुंबईतील पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय लोकलमध्ये ११ जुलै २००६ ला झालेल्या साखळी स्फोटांप्रकरणी सर्व १२ आरोपींची उच्च न्यायालयाने निर्दोष सुटका केली. त्यानंतर आता खटल्याचे विशेष अभियोक्ता यांच्याशी सल्लामसलत करून व निकालाच्या विश्लेषणाअंती पुढील निर्णय घेण्यात येईल, अशी प्रतिक्रिया दहशतवाद विरोधी पथकाकडून(एटीएस) देण्यात आली आहे.
मुंबईत २००६ उपनगरीय लोकल गाड्यांमध्ये झालेल्या स्फोटांप्रकरणी दहशवाद विरोधी पथकाने महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा(मोक्का) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे या प्रकरणी मोक्का विशेष न्यायालयात खटला चालवण्यात आला होता. ३० सप्टेंबर, २०१५ ला विशेष न्यायालयाने याप्रकरणी निकाल दिला. त्यात पाच ५ आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा, सात आरोपींना जन्मठेपेची शिक्षा दिली आणि एका आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली. पण याप्रकरणी उच्च न्यायालयाने निकाल देताना विशेष न्यायालयाने दिलेली शिक्षा रद्द करून आरोपींची तातडीने सुटका करण्याचे आदेश दिले. या खटल्यात एएसजी राजा ठाकरे आणि स्पेशल पी. पी. चिमलकर यांनी राज्य सरकारची बाजू मांडली.
या खटल्याची सुनावणी न्यायमूर्ती अनिल किलोर व न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या खंडपीठाने याबाबतचा निर्णय दिला. याबाबतची सुनावणी खंडपीठाकडे जुलै २०२४ पासून सुरू होती. त्यामध्ये त्यामध्ये अभियोग व बचाव पक्षाचे युक्तीवाद २७ जानेवारी २०१५ ला पूर्ण झाला. त्यानंतर सोमवारी (ता.२१ जुलेैला) याबाबत निकाल देण्यात आला होता. त्यात मृत्युदंडाचे संदर्भ नाकारण्यात आले आणि दोषी आरोपींचे अपिल मान्य करण्यात आले. तसेच मोक्का विशेष न्यायालयाचा निकाल रद्द करण्यात आला.
एटीएस काय पाऊल उचलणार?
एटीएसने याप्रकरणी आरोपी केलेल्या सर्व १३ आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आल्यानंतर आता एटीएसकडून याबाबत प्रतिक्रिया देण्यात आली असून विशेष अभियोक्ता यांच्याशी सल्लामसलत करून व निकालाच्या विश्लेषणाअंती पुढील निर्णय घेण्यात येत आहे, असे एटीएसकडून सांगण्यात आले.
एटीएस व गुन्हे शाखेचे परस्पर विरोधी दावे
स्फोटानंतर महाराष्ट्र एटीएसने २००६ मध्ये काही आठवड्यानंतर कटाचा पर्दाफाश केल्याचा दावा केला आणि १२ जणांवर आरोप ठेवले. कथितपणे, या लोकल ट्रेन स्फोटांचा कट पाकिस्तानची गुप्तहेर संस्था आयएसआयच्या आदेशावर रचला गेला होता आणि लष्कर-ए-तोयबाने सिमीच्या मदतीने तो अंमलात आणला होता. हे बॉम्ब गोवंडीतील झोपडपट्टीत प्रेशर कुकरमध्ये तयार करण्यात आले होते आणि नंतर मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये लावण्यात आले.
मात्र, २००८ मध्ये मुंबई गुन्हे शाखेने इंडियन मुजाहिदीन या कथित अतिरेकी संघटनेच्या सादिक शेख नावाच्या सदस्याला अटक केली आणि प्रकरणाला नवे वळण मिळाले. गुन्हे शाखेने त्यावेळी इंडियन मुजाहिदीननेच या स्फोटांची योजना आखली होती आणि सादिकने इतरांसह मिळून बॉम्ब ठेवले होते, असा दावा केला होता. एटीएसच्या दाव्यांना फेटाळून लावत स्फोटात वापरण्यात आलेले बॉम्ब शिवडीतील एका सदनिकेत तयार करण्यात आले होते, असा दावा गुन्हे शाखेने केला होता. त्यावेळी फैजल नावाच्या संशयिताला मिरा रोड येथून गुन्हे शाखेने पकडले होते.
अॅन्टॉपहिलमध्ये चकमक
मुंबईत २००६ चा साखळी स्फोट घडवण्यासाठी ११ दहशतवादी पाकिस्तानातून आले होते. त्यातील एक २२ ऑगस्ट २००६ मध्ये मुंबईतील अॅन्टॉपहिल येथील चकमकीत ठार झाला होता. मोहम्मद अली याला दहशतवाद विरोधी पथकाने(एटीएस) यांंच्या चकमकीत ठार केले होते. तर, दुसरा बॉम्ब ठेवताना ठार झाल्याचा दावा करण्यात आला होता.