मुंबई : बेस्ट उपक्रमातील भाडेतत्त्वावरील बसचा शुक्रवारी सकाळी वनराई पोलीस चौकीसमोर भीषण अपघात झाला. या अपघातात चालक, वाहक आणि सहा प्रवासी जखमी झाले. या अपघातात बेस्ट बसचे देखील प्रचंड नुकसान झाले आहे.
बेस्ट उपक्रमातील वडाळा आगारातील मातेश्वरी कंपनीची भाडेतत्त्वावरील बस दिंडोशीहून शिवडी बस स्थानकाकडे जात होती. ही बस सकाळी ६.३० च्या सुमारास वनराई पोलीस चौकीसमोरून जात होती. त्याच वेळी एक खासगी वाहन अचानक सेवा रस्त्यावरून बससमोर आले. परिणामी, बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बेस्ट बसने एका ट्रकला जोरदार धडक दिली. या अपघातात बसचे चालक, वाहक आणि सहा प्रवासी जखमी झाले असून बसच्या पुढील बाजूचे प्रचंड नुकसान झाले. जखमी बस वाहकाने सर्व जखमी प्रवाशांना उपचारासाठी जोगेश्वरीतील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल केले. तसेच, घटनास्थळी बेस्टचे अधिकारी, कर्मचारी, मातेश्वरीचे अधिकारी आणि कर्मचारी रवाना झाले.
जखमी प्रवाशांची नावे
- अशरफ हुसेन (६६)
- सीताराम गायकवाड (६०)
- भारती मांडवकर (५६)
- सुधाकर रेवाळे (५७)
- पोचिया कानपोची (३०)
- अमित यादव (३५)