मुंबई : विक्रोळी (पूर्व) येथे गुरुवारी बेस्ट उपक्रमातील भाडेतत्त्वावरील बसला आग लागली. घटनास्थळी तातडीने अग्निशमनाचे अधिकारी आणि कर्मचारी पोहचले आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळविले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
विक्रोळी येथील प्रगती विद्यालयाजवळ ३९७ क्रमांकाच्या मार्गावर सीएनजीवर धावणाऱ्या बेस्ट बसला आग लागली. ही घटना गुरुवारी दुपारी ३.२९ वाजता घडली आणि दुपारी ३.४४ वाजता आग आटोक्यात आली, असे मुंबई अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. ‘एमएच-०३ ईजी-१६५४’ क्रमांकाची नोंदणीकृत आणि कंत्राटदार मारुती ट्रॅव्हल्सची बस विक्रोळी स्थानकातून कन्नमवार नगरला जात असताना चालकाच्या केबिनमधून धूर निघत असल्याचे निदर्शनास आले, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
बसगाडीतील विद्युत यंत्रणेत शॉर्टसर्किट झाल्यामुळे धूर आला आणि नंतर आग लागल्याचे निष्कर्ष प्राथमिक तपासात काढण्यात आला. अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचण्यापूर्वी चालक आणि वाहकाने प्रसंगावधान राखून आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक यंत्राचा वापर केला आणि सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढले.