Mumbai BEST Election Result 2025 : बेस्टच्या पतपेढीच्या निवडणुकीत अनपेक्षित निकाल आला असून कामगार नेते शशांक राव यांच्या पॅनलचे १४ उमेदवार निवडून आले आहेत. तर आमदार प्रसाद लाड यांच्या पॅनलचे सात उमेदवार निवडून आले आहेत. ठाकरे बंधुंच्या पॅनलचा एकही उमेदवार जिंकून आलेला नाही. त्यामुळे बेस्टच्या पतपेढीवर राव यांच्या बेस्ट वर्कर्स युनियनची सत्ता आली आहे.
दि बेस्ट एम्प्लॉईज को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि.ची पंचवार्षिक निवडणूक सोमवारी पार पडली. भर पावसाताही कामगारांनी प्रचंड प्रतिसाद दिला व तब्बल ८३ टक्के मतदान झाले. ही निवडणूक ठाकरे बंधू आणि भाजप विशेषतः आमदार प्रसाद लाड यांच्यासाठी प्रतिष्ठेची झाली होती.
पावसामुळे मतमोजणीला उशीर झाला होता व मंगळवारी मध्यरात्री उशीरापर्यंत मतमोजणी सुरू होती. या निवडणुकीत ठाकरे बंधू विरुद्ध आमदार प्रसाद लाड अशी प्रमुख लढत होईल अशी शक्यता वर्तवली जात होती. दोन्ही गटांकडून आपलाच विजय झाल्याचा दावा समाजमाध्यमांवरून केला जात होता. परंतु मतमोजणीचे कल पाहता खरी लढत प्रसाद लाड यांचे पॅनेल आणि शशांक राव यांच्या पॅनेल यांच्यातच झाली होती. निकालही तसेच आले आहेत. शशांक राव यांच्या पॅनलने कोणताही गाजवाजा न करता दणदणीत विजय मिळवला. तर ठाकरे बंधुंच्या पॅनलला एकही जागा मिळालेली नाही.
शिवसेनेच्या (ठाकरे) कामगार सेनेचे जास्तीत जास्त सदस्य हे या पतपेढीचे सभासद आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी ही निवडणूक सोपी होती. म्हणूनच कामगार सेनेने पॅनल तयार करताना अति आत्मविश्वासाने अनेक निर्णय घेतले. तयारी न करताच ठाकरे बंधुचे एकत्र पॅनल जाहीर करणे, शिंदे यांच्या शिवसेनेतील एका महिलेला तिकीट देणे असे निर्णय घेतले. कामगार सेनेच्या विद्यमान संचालक मंडळाने केलेले गैरव्यवहार हे सुद्धा यावेळी प्रचाराच्या केंद्रस्थानी होते. त्याचाही फटका कामगार सेनेच्या पॅनलला बसला आहे. तर आमदार प्रसाद लाड हे पूर्ण ताकदीने पाच संघटनांसह उतरले होते.
ही निवडणूक म्हणजे मुंबई महापालिका निवडणुकीची रंगीत तालीमच मानली जात होती. त्यामुळे या निवडणुकीच्या निकालाकडे बेस्टच्या कामगारांबरोबरच राजकीय वर्तुळाचे आणि ठाकरे बंधूंच्या कार्यकर्त्यांचे व भाजपच्याही कार्यकर्त्यांचे लक्ष लागले होते.
बेस्ट उपक्रमाची सर्व आगरे आणि बेस्टची कार्यालये अशा ३५ केंद्रावर ही निवडणूक पार पडली. पतपेढीच्या १५,१२३ सभासदांपैकी १२,६५६ सभासदांनी मतदान केले. मंगळवारी वडाळा आगारात सकाळी ९ वाजता मतमोजणी होणार होती. मात्र पावसामुळे मतमोजणी करणारे अधिकारी वेळेवर पोहोचू शकले नाही. त्यामुळे प्रत्यक्षात दुपारी दोन वाजल्यानंतर मतमोजणीला सुरूवात झाली. मतमोजणी रात्री उशीरापर्यंत सुरू होती. एकूण ३५ केंद्र आणि दीडशे उमेदवार असल्यामुळे मतपत्रिकांवरच्या या मतमोजणीला खूप विलंब झाला. निवडणुकीचा निकाल पहाटे जाहीर झाला.

आमदार प्रसाद लाड हे या निवडणुकीसाठी पूर्ण ताकदीने मैदानात उतरले होते. तर शिवसेनेने (ठाकरे) आधी ही निवडणूक फारशी गांभीर्याने घेतली नाही. परंतु शिवसेना आणि मनसेने एकत्र येऊन पॅनल तयार केल्यामुळे ही निवडणूक ठाकरे बंधुंच्या नावासाठी प्रतिष्ठेची झाली होती. अगदी शेवटच्या दिवशी शिवसेनेने आपली सगळी यंत्रणा, विभागप्रमुख, नगरसेवक कामाला लावले होते. निवडणुकीच्या आधीच संचालक मंडळाला आर्थिक गुन्हे शाखेने नोटीस बजावल्यामुळे ठाकरे यांचे पॅनल वादात सापडले होते. तर लाड यांच्या श्रमिक उत्कर्ष सभा पॅनलने पैशाची पाकिटे वाटल्याचा आरोप मनसेचे संदीप देशपांडे यांनी केला होता. त्यामुळे बेस्टच्या पतपेढीची ही निवडणूक चांगलीच गाजली आहे.
असा आहे निकाल
बेस्ट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड या पंचवार्षिक निवडणुकीत शशांक राव पॅनलचे विजयी उमेदवार – एकूण १४
१) आंबेकर मिलिंद शामराव
२) आंब्रे संजय तुकाराम
३) जाधव प्रकाश प्रताप
४) जाधव शिवाजी विठ्ठलराव
५) अम्मुंडकर शशिकांत शांताराम
६) खरमाटे शिवाजी विश्वनाथ
७) भिसे उज्ज्वल मधुकर
८) धेंडे मधुसूदन विठ्ठल
९) कोरे नितीन गजानन
१०) किरात संदीप अशोक
महिला राखीव
११) डोंगरे भाग्यश्री रतन
अनुसूचित जाती/ जमाती
१२) धोंगडे प्रभाकर खंडू
भटक्या विमुक्त जाती
१३) चांगण किरण रावसाहेब
इतर मागासवर्गीय
१४) शिंदे दत्तात्रय बाबुराव
प्रसाद लाड यांच्या पॅनेलमधील विजयी उमेदवार – एकूण ७
१) रामचंद्र बागवे
२) संतोष बेंद्रे
३) संतोष चतुर
४) राजेंद्र गोरे
५) विजयकुमार कानडे
६) रोहित केणी
महिला राखीव मतदार संघ
७) रोहिणी बाईत