मुंबई : गेल्या काही दिवसांपासून बेस्ट बस ताफ्यातील स्वमालकीच्या बस सेवानिवृत्त होत आहेत. परंतु, नव्याने स्वमालकीच्या बस ताफ्यात दाखल न झाल्याने, फक्त ३०८ बस शिल्लक राहिल्या आहेत. नुकताच शेवटची जवाहरलाल नेहरू नागरी पुनर्विकास अभियान (जेएनएनयूआरएम) बसगाडी सेवानिवृत्त झाली. या बसगाडीचा ‘आपली बेस्ट आपल्याचसाठी’ प्रवासी संघटनेकडून निरोप समारंभ साजरा केला.
मुंबईच्या रस्त्यावरील जीवनवाहिनी म्हणून बेस्ट बसगाडीला ओळखले जाते. स्वस्तात, वेगवान आणि गारेगार प्रवास बेस्ट बसमधून होत असल्याने दररोज सुमारे ३० लाख प्रवाशांचा प्रवास होतो. परंतु, बेस्टमधील स्वमालकीच्या बस झपाट्याने कमी होत असल्याने बसची संख्या कमी होत आहे. सध्या एकूण ताफ्यापैकी केवळ ११.६३ टक्के स्वमालकीच्या आणि ८८.३७ टक्के खासगी कंपन्यांच्या बस आहेत. खासगी कंपनीच्या बसगाड्यांची योग्यरित्या देखभाल-दुरूस्ती होत नसल्याने चालक, प्रवासी वर्ग वैतागलेला आहे. त्यामुळे स्वमालकीच्या बस वाढविण्यासाठी प्रवाशांकडून अभियान राबविण्यात येणार आहे.
जेएनएनयूआरएम अंतर्गत बेस्ट उपक्रमात अशोक लेलँडच्या एकूण ७५० बस २००९ साली दाखल झाल्या होत्या. पंधरा वर्षे मुंबईच्या रस्त्यांवरून धावत, लाखो प्रवाशांना सुरक्षित आणि परवडणारी सेवा पुरवणाऱ्या या बसचा प्रवास पूर्ण झाला. ऑक्टोबर महिन्यात अनेक जेएनएनयूआरएमच्या बस सेवानिवृत्त झाल्या. तर, या ताफ्यातील शेवटची मोठ्या आकाराची जेएनएनयूआरएम बसगाडी क्रमांक १८६४ (एमएच ०१ एपी ०७४८) या बसगाडीला अखेरचा निरोप देण्यात आला. ‘आपली बेस्ट आपल्याचसाठी’ या प्रवासी संघटनेकडून या बस गाडीच्या शेवटच्या प्रवासादिनी अनोखा निरोप सोहळा आयोजित करण्यात आला होता.
या संस्थेच्या पदाधिकारी, काही बसप्रेमी मंडळी आणि बेस्ट उपक्रमाचे अभियांत्रिकी कर्मचारी यांनी हार, फुले, पताका आणि फुगे बांधून बसगाडीची आकर्षक सजावट केली. निवृत्तफेरीकरिता या बसच्या मूळ रंगावर पुन्हा रंग लावण्यात आला. तसेच बेस्टचे निवृत्त अभियंता सुहास पेडणेकर यांनी स्वतःच्या हस्ताक्षरात बसगाडीचा ताफा क्रमांक आणि आगाराची पुन्हा नोंद केली. चालक संतोषकुमार शर्मा, वाहक विश्वास भुलुगडे यांचा बेस्ट बसप्रेमींनी सत्कार केला. मालवणी आगारातील वरिष्ठ अभियांत्रिकी अधिकारी प्रसाद दीक्षित यांच्या हस्ते केक कापून बसगाडीला तिच्या शेवटच्या प्रवासासाठी बसमार्ग क्रमांक २०७ वरून दहिसर बस स्थानकाकडे मार्गस्थ केले. यावेळी या सजवलेल्या बसगाडीने प्रवाशांचे आणि नागरिकांचे विशेष लक्ष वेधून घेतले होते.
बेस्ट उपक्रमातील स्वमालकीच्या बसगाड्यांचा ताफा कमी झाला आहे. हा ताफा वाढविण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात येणे आवश्यक आहे. – रुपेश शेलटकर, अध्यक्ष, आपली बेस्ट आपल्याचसाठी
बेस्ट बस सेवानिवृत्त होत असताना, नव्याने स्वमालकीचा ताफा येणे आवश्यक आहे. या सर्व परिस्थितीवर बारकाईने लक्ष आहे. याबाबत लवकरच बेस्ट उपक्रमाच्या महाव्यवस्थापकांची भेट घेऊन त्यांना याबाबत सांगण्यात येणार आहे. – गौरव चिंदरकर, प्रवक्ते, आपली बेस्ट आपल्याचसाठी
