मुंबई : ग्रॅन्ट रोड येथील नाना चौकात व्हीलचेअरवरील एका अपंग तरुणीला बसमध्ये चढण्यास मदत नाकारणाऱ्या वाहक, चालकांकडून बेस्ट उपक्रमाने खुलासा मागविला होता. मात्र, अद्याप बेस्टच्या वाहतूक विभागाकडून त्याबाबत खुलासा मिळाला नसल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे संबंधित बाब बेस्ट प्रशासनाने गांभीर्याने घेतली की नाही, अशी शंका निर्माण झाली आहे.
संबंधित तरुणी बराच वेळ रस्त्यावर बसची वाट पाहत होती. तीन बस गेल्यांनतर चौथ्या बसची चित्रफीत काढण्याचा निर्णय तरुणीने घेतला. त्यांनतर आलेल्या चौथ्या बस चालकाने बस थांबवल्याने तरुणीला दिलासा मिळाला होता. तरुणीने बसमध्ये व्हीलचेअरसह चढण्यासाठी बसविण्यात आलेली यंत्रणा सुरू करण्याची मागणी वाहकाकडे केली. मात्र, संबंधित यंत्रणा वापरता येत नसल्याचे कारण देत प्रवेश नाकारण्यात आल्याचे तरुणीने सांगितले.
त्याबाबतची चित्रफीत प्रसिद्ध झाल्यांनतर बेस्ट उपक्रमाच्या चालक वाहकांवर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती. तसेच, बसमधील चालक अनेक वेळा बस थांबवत नाहीत. त्यांना वेगवेगळी कारणे दिली जातात, असे मत अनेक अपंग तरुणांनी व्यक्त केले होते. त्यांनतर बेस्ट प्रशासनाने तरुणीला मदत नाकारणाऱ्या वाहक, वाचकांनी संबंधित घटनेबाबत खुलासा द्यावा, असे पत्र वाहतूक विभागाला पाठविले होते. तीन दिवसांत खुलासा येणे अपेक्षित होते. मात्र, आठवडा उलटला तरीही अद्याप वाहक, चालकांकडून खुलासा आलेला नाही.
खुलासा देण्याबाबत वाहतूक विभागाला पत्र पाठविण्यात आले आहे. संबंधित बेस्ट आगारातील अधिकारी चालक, वाहकांची बाजू ऐकून खुलासा करतील, असे बेस्ट उपक्रमातील अधिकाऱ्यांनी सांगितले.