मुंबई : मुंबईच्या आरोग्य व्यवस्थेचा कणा असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या केईएम, शीव व नायर या तीन महत्त्वाच्या रुग्णालयांमध्ये प्राध्यापक, सहायोगी प्राध्यापक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, क्ष किरण तंत्रज्ञ, परिसेविका, सफाई कर्मचारी, कक्ष परिचर अशी विविध कर्मचाऱ्यांची तब्बल ४५ टक्के पदे रिक्त असल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे रुग्णसेवेवर परिणाम होण्याबरोबरच असलेल्या कर्मचाऱ्यांवरील ताणही वाढला आहे.

जन आरोग्य हक्क अभियानाने ही आकडेवारी उघड केली आहे. मुंबई महानगरपालिकेने रुग्णालयांचे सार्वजनिक खासगी भागीदारीतून (पीपीपी) रुग्णालयांचे खासगीकरण करण्याऐवजी रिक्त पदे भरून सार्वजनिक आरोग्य सेवांचे बळकटीकरण करण्यावर भर द्यावा अशा सूचनाही अभियानकडून करण्यात आल्या आहेत.

केईएम, शीव व नायर या तीन महत्त्वाच्या रुग्णालयांमध्ये प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, तंत्रज्ञ, परिचारिका यांची १ हजार १७ पदे असून त्यातील फक्त ४७३ पदे कायम नियुक्तीने भरलेली आहेत. यामध्ये केईएम रुग्णालयामध्ये प्राध्यापकांची १०६ पदे मंजूर असून, त्यातील ४० पदे रिक्त आहेत. सहयोगी प्राध्यापकांची १६८ पदे मंजूर असून, ५० पदे रिक्त आहेत. प्रयोगशाळा सहाय्यकाची ३३ पदे असून, सर्वच पदे रिक्त आहेत. प्रयोगशाळा परिचरच्या २७ पदांपैकी १० पदे रिक्त आहेत. क्ष किरण तंत्रज्ञांची ५२ पैकी ३० पदे रिक्त असून, सहाय्यक तंत्रज्ञांची ७२ पैकी ६१ पदे, परिचारिकांच्या ११६ पैकी १३ पदे रिक्त आहेत.

शीव रुग्णालयातील ९९ प्राध्यापकांपैकी ५४ पदे रिक्त असून, सहयोगी प्राध्यापकांची १३८ पैकी ४० पदे, सहाय्यक प्राध्यापकांची २२५ पैकी १५३ पदे रिक्त आहेत. त्याचप्रमाणे औषध वितरकांची ४४ पैकी २३ पदे, प्रयोगशाळा सहाय्यकाची सर्व २३ पदे, प्रयोगशाळा तंत्रज्ञांची ७१ पैकी ३४ पदे, क्ष किरण तंत्रज्ञांची ४४ पैकी १९ पदे रिक्त आहेत.

नायर रुग्णालयातील ७८ प्राध्यापकांपैकी ३१ पदे रिक्त असून, सहयोगी प्राध्यापकांची ११५ पैकी २९ पदे, सहाय्यक प्राध्यापकांची १८४ पैकी १३२ पदे रिक्त आहेत. त्याचप्रमाणे प्रयोगशाळा तंत्रज्ञाची ६६ पैकी ३० पदे, क्ष किरण तंत्रज्ञांची ४५ पैकी २८ पदे, परिसेविका ९९ पैकी २७, आयांची १९२ पैकी ६८ पदे, कक्ष परिचरची ३८३ पैकी १३० आणि सफाई कामगारांची ३२५ पैकी १२० पदे रिक्त आहेत.

खासगी करणाचा डाव?

मुंबई महानगरपालिकेच्या या तिन्ही रुग्णालयांमधील रिक्त पदे भरल्यास रुग्णालयांमधील कर्मचारी व कामगारांवरील ताण कमी हाेण्यास मदत होऊ शकते. मात्र मुंबई महानगरपालिका पद भरती करण्याऐवजी रुग्णालयांचा पीपीपीमार्फत विकास करून त्यांचे खासगीकरण करण्याचा डाव आखत आहे. त्याचप्रमाणे मुंबई महानगरपालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयांतून दरवर्षी सुमारे १२०० एमबीबीएस आणि एक हजार पदव्युत्तर डॉक्टर शिक्षण घेऊन बाहेर पडतात. या डॉक्टरांची रुग्णालयातच भरती केल्यास डॉक्टरांची पदे भरणे शक्य आहे. तरीही मुंबई महानगरपालिकेकडून कंत्राटी डॉक्टरांची भरती करून सर्वसामान्यांवर अन्याय केला जात असल्याचे जन आरोग्य हक्क अभियानाकडून सांगण्यात आले.