खड्डेमुक्तीचे आश्वासन देत दरवर्षी रस्त्यांचा खर्च हजारो कोटी रुपयांवर नेऊन ठेवणाऱ्या पालिकेने आता पुढचे पाऊल उचलत रस्त्यांच्या रचनेसाठीही सल्लागार नेमण्याचे ठरवले असून पालिका प्रशासन रस्तेदुरुस्तीसाठी १७ कोटी रुपये मोजणार आहे. स्थायी समितीच्या शुक्रवारच्या बैठकीत हा प्रस्ताव चर्चेला येईल.
एका पावसात खड्डेमय होत असलेले रस्ते मुंबईकरांच्या वर्षांनुवर्षे वाटय़ाला येत आहेत. दरवर्षी उत्तम रस्ते देण्याच्या आश्वासनातून पालिका रस्त्यांच्या खर्चात दामदुपटीने वाढ करते. गेल्या वर्षी रस्त्यांसाठी पालिकेने २,३०९ कोटी रुपये खर्च केले होते. २०१५-१६ या वर्षांसाठी हा खर्च ३,२०० कोटी रुपयांवर नेण्यात आला आहे. रस्तेदुरुस्तीसाठी हजारो कोटी रुपये खर्च केल्यावरही मुंबईकरांना चांगले रस्ते देऊ न शकलेल्या पालिकेला आता पावसाळ्याच्या तोंडावर सल्लागार नेमण्याची युक्ती सुचली आहे. आतापर्यंत पालिकेचे रस्ते विभागातील अभियंता रस्त्यांची आखणी, दुरुस्तीसाठी आराखडा तयार करत होते. आता मात्र या कामासाठी खासगी सल्लागार नेमण्यात येत असून त्यात सात सदस्यांचा समावेश असेल. जमिनीची चाचणी करून पदपथ, रस्त्यांखालून जात असलेल्या जलवाहिन्यांचे जाळे यांचे योग्य नियोजन करून रस्त्यांच्या दर्जात सुधारणा करण्यासाठी ही समिती नेमली जात असल्याचे पालिका प्रशासनाकडून प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.

सल्लागारांचे मानधन
* शहर – २ कोटी ८६ लाख रुपये
* पश्चिम उपनगर – १० कोटी ८९ लाख रुपये
* पूर्व उपनगर – ३ कोटी १४ लाख रुपये