मुंबईः पैशांच्या वादातून मोठ्या भावाची हत्या करून नैसर्गिक मृत्यू झाल्याचा बनाव रचणाऱ्या आरोपीला पार्कसाईट पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी सुरूवातीला पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली होती. त्यानंतर कुटुंबियांनी मृतदेह अंत्यसंस्कारासाठी गावी नेला होता. पण पोलिसांनी याप्रकरणी तपास करून हत्येचा गुन्हा दाखल करून लहान भावाला अटक केली. आरोपीने मृत व्यक्तीला गंभीर मारहाण केली, तसेच त्याचा गळा दाबून त्याची हत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले.

नैसर्गिक मृत्यूचा बनाव

राहुल बळीराम आलदर(३४) असे मृत व्यक्तीचे असून त्याच्या हत्येप्रकरणी पार्कसाईट पोलिसांनी आरोपी आकाश बळीराम आलदर(२७) याला अटक केली आहे. आरोपी आकाश मृत राहुलचा धाकटा भाऊ आहे. राहुलला ६ जुलैला बेशुद्ध अवस्थेत घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात आणण्यात आले होते. विक्रोळी येथील राहत्या घरात अचानक पडल्यामुळे तो बेशुद्ध झाल्याचे त्यावेळी रुग्णालयात सांगण्यात आले. त्यावेळी डॉक्टरांनी तपासणी करून राहुलला मृत घोषित केले. त्यानुसार पोलिसांनी याप्रकरणी अपमृत्यूची नोंद केली.

राहूलला दारू पिण्याचे व्यसन होते व २०२१ मध्ये त्याला हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगितले होते. त्याचे दारूचे व्यसन सुटावे यासाठी त्याला नशा मुक्ती केंद्रातही भरती करण्यात आले होते. तेथे उपचार घेऊन घरी परत आल्यानंतर त्याने दारू पिणे सोडले नाही, असे आकाशने सांगितले होते. राहुलचा मृत्यू झाला, त्यावेळी तो घरी एकटाच असल्याचेही त्याने सांगितले. याप्रकरणानंतर कुटुंबियांनी मृतदेह सोलापूर येथील गावी नेऊन अंत्य संस्कार केले.

मित्रांच्या चौकशीत भांडणाची माहिती

आकाशने राहुल बेशुद्ध झाला, त्यावेळी आपण घरी नसल्याचे सांगितले होते. पण राहुलला रुग्णालयात नेणाऱ्या मित्रांच्या चौकशीत राहुल व आकाश यांच्यात भांडण झाल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. या काळात अंतिम वैद्यकीय अहवाल पोलिसांना प्राप्त झाला. त्यावेळी राहुलच्या शरीरात अनेक ठिकाणी अंतर्गत रक्तस्त्राव झाल्याचे निष्पन्न झाले. तसेच त्याचा गळा दाबण्यात आल्याचेही स्पष्ट झाले. त्यामुळे राहुलची हत्या झाल्याचा संशयाला अधिक बळकटी मिळाली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२६ जुलैला कुटुंबिय गावावरून परतले असता त्यांनी राहुलच्या वडिलांकडे चौकशी केली असता त्यांनी पैशांच्या वादातून भावांमध्ये भांडण झाल्याचे सांगितले. त्यावेळी आकाशने राहुलला गंभीर मारहाण केली. त्याचा भींतीवर आपटून त्याचा गळा दाबल्याचीही कबुली दिली. त्यावरून आकाशनेच मोठा भाऊ राहुलची हत्या केल्याचे स्पष्ट झाले. अखेर पोलिसांनी आकाशला याप्रकरणी अटक केली.