मुंबई : भारत – पाकिस्तानमधील कारगिल युद्ध, उरीचा भूकंप, ऑपरेशन सिंदूर आदी विविध मोहिमांदरम्यान महत्त्वपूर्ण कामगिरी बजावणारे कॅप्टन भार्गव सदाशिव शिंदे भारतीय लष्करातील ३३ वर्षांच्या सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी कुटुंबिय व मित्रमंडळींनी रविवार, ५ ऑक्टोबर रोजी मुंबईतील लोअर परळ परिसरात ‘गौरव यात्रा’ काढली होती. या गौरव यात्रेत व त्यानंतर पार पडलेल्या सेवानिवृत्ती सोहळ्यात शेकडो नागरिक सहभागी झाले होते. तसेच शिवसेनेचे (ठाकरे) विधान परिषद आमदार सुनील शिंदे यांनीही सहभागी होऊन कॅप्टन भार्गव शिंदे यांना सन्मानित केले.

कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील रावळगाव येथे सर्वसामान्य कुटुंबात कॅप्टन भार्गव शिंदे यांचा जन्म झाला. त्यानंतर काही वर्षांनी कॅप्टन भार्गव शिंदे मुंबईतील लोअर परळ येथील पारडीवाला चाळीतील (आताची द बाया सेंट्रल इमारत) छोट्याशा खोलीत स्थायिक झाले. त्यांचे काका भारतीय लष्करात ‘१६ मराठा बटालियन’मध्ये होते. त्यामुळे लहानपणीच भारतीय लष्करात जाऊन देशसेवा करण्याची आवड त्यांच्यामध्ये निर्माण झाली होती. त्यानंतर मेहनत व जिद्दीच्या जोरावर कॅप्टन भार्गव शिंदे हे २९ डिसेंबर १९९२ रोजी भारतीय लष्करात रूजू झाले आणि त्यांनी ‘११६ इंजिनीअर रेजिमेंट’चे नेतृत्व केले. त्यांनी भारत व पाकिस्तानदरम्यान १९९९ साली झालेल्या कारगिल युद्धात ते सहभागी झाले होते. तसेच उरी येथे २००५ साली मोठा भूकंप झाला होता, तेव्हा त्या ठिकाणच्या बचावकार्यात ते दोन महिने सहभागी झाले होते. तसेच जम्मू – काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवून चोख प्रत्युत्तर दिले. या महत्वपूर्ण मोहिमेतही कॅप्टन भार्गव शिंदे यांचा सहभाग होता. भारतीय लष्करातील ३३ वर्षांच्या गौरवशाली सेवेनंतर कॅप्टन भार्गव शिंदे ३० सप्टेंबर २०२५ रोजी सेवानिवृत्त झाले. या ३३ वर्षांच्या सेवेत त्यांना भारतीय लष्करातील महत्त्वाच्या पदकांनीही गौरविण्यात आले आहे.

‘मी लहानपणीच देशसेवा करण्याचे निश्चित केले होते. यादृष्टीने शाळा व महाविद्यालयात असतानाच मेहनत घेऊन तयारी केली. आयुष्यातील ३३ वर्षे देशाच्या सेवेसाठी देता आल्याचा आनंद आहे. सध्याच्या युवा पिढीनेही आपल्यातील कौशल्ये ओळखावी आणि त्या कौशल्यांचा देशसेवेसाठी कसा वापर होईल, याचा विचार करावा. तसेच ध्येय निश्चित करून भारतीय लष्करात रूजू होण्यासाठी प्रयत्न करावेत’, असे कॅप्टन भार्गव शिंदे यांनी ‘लोकसता’शी बोलताना सांगितले.