Devendra Fadnavis On Mumbai Central Station : मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाचं नावं बदलण्यात येणार असल्याची चर्चा सुरू आहे. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (१४ जुलै) विधानसभेत बोलताना यावर भाष्य केलं आहे. मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाचं नाव बदलून जगन्नाथ नाना शंकरशेठ असं करण्याबाबतच्या प्रस्तावाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर माहिती सभागृहात सांगितली आहे.
शिवसेना (ठाकरे) पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी सीएसटी स्थानक परिसरात कुठेही छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा नाही, असा सवाल उपस्थित केला. तसेच मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाला जगन्नाथ नाना शंकरशेठ असं नाव देण्यात यावं, अशी मागणी भास्कर जाधव यांनी केली. त्यांच्या या प्रश्नावर उत्तर देताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाच्या नवीन नावाच्या प्रस्तावाबाबत सभागृहात माहिती सांगितली आहे.
मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?
“शिवसेना (ठाकरे) पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांच्या माध्यमातून मी सभागृहाला सांगू इच्छितो की छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा अतिशय भव्य अशा पूर्नविकासाच्या प्रकल्पाबाबत काम सुरू आहे. अतिशय चांगल्या प्रकारचं स्टेशन त्या ठिकाणी तयार होतंय. हे तयार करत असताना जो आराखडा तयार करण्यात आलेला आहे, त्या आराखड्याचाच एक भाग म्हणून त्या ठिकाणी अतिशय भव्य असा छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात येणार आहे. त्यामुळे कोणताही प्रस्ताव करण्याची आवश्यकता नाही. ते विचारात घेऊनत याबाबतचा आराखडा तयार करण्यात आलेला आहे”, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.
“भास्कर जाधव यांनी दुसरा विषय मांडला की, मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाच्या नावाबाबतचा. खरं तर जगन्नाथ नाना शंकरशेठ यांचा मुंबईच्या जडणघडणीमध्ये खूप मोठा वाटा आहे. फक्त रेल्वेच नाही तर वेगवेगळ्या नवाचारांमध्ये त्यांचं नाव अग्रणी आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होते तेव्हाच राज्याच्या मंत्रिमंडळाने मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाला जगन्नाथ नाना शंकरशेठ यांचं नाव देण्याबाबतचा प्रस्ताव तयार केला आणि केंद्र सरकारला पाठवलेला दिला आहे. तो प्रस्ताव केंद्र सरकारकडे प्रलंबित आहे. त्या प्रस्तावाचा पाठपुरावा केला जाईल”, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.