मुंबई : आयुष अभ्यासक्रमाच्या दोन फेऱ्यांना मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून शनिवारी तिसऱ्या फेरीसाठीची निवड यादी जाहीर करण्यात येणार आहे. आयुषअंतर्गत येणाऱ्या आयुर्वेद, होमियोपॅथी आणि युनानी अभ्यासक्रमाच्या राज्य कोट्यातील १३ हजार ४९५ पैकी ९ हजार २१० जागांवर आतापर्यंत प्रवेश झाले असून, तिसऱ्या फेरीसाठी ४ हजार २८५ जागा रिक्त राहिल्या आहेत.
आयुर्वेद (बीएएमएस) अभ्यासक्रमाच्या राज्यातील २२ आणि ११७ खासगी अशा एकूण १३९ महाविद्यालयांमध्ये राज्य कोट्यासाठी ९ हजार ४०६ जागा उपलब्ध होत्या. पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये ६ हजार ९३१ जागांवर प्रवेश झाले. यामध्ये सरकारी महाविद्यालयामधील १ हजार ५२८ पैकी १ हजार २२४ जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. तसेच खासगी महाविद्यालयांमधील ७ हजार ८७८ जागांपैकी ५ हजार ७०७ जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. त्यामुळे बीएएमएस अभ्यासक्रमासाठी २ हजार ५७५ जागा रिक्त असून, यात सरकारी महाविद्यालयांमधील ३०४ आणि खासगी महाविद्यालयांमधील २ हजार १७१ जागांचा समावेश आहे.
होमिओपॅथी (बीएचएमएस) या अभ्यासक्रमासाठी राज्यातील ५५ महाविद्यालयांमध्ये ३ हजार ७४० जागा उपलब्ध आहेत. यामध्ये सरकारी महाविद्यालयामध्ये ५४, तर ५४ खासगी महाविद्यालयांमध्ये ३ हजार ६८६ जागा आहेत. सरकारी महाविद्यालयातील २३ जागांवर प्रवेश झाले असून, ३१ जागा रिक्त आहेत. तर खासगी महाविद्यालयांतील १ हजार ९४० जागांवर प्रवेश झाले असून, १ हजार ७४६ जागा रिक्त आहेत. त्यामुळे बीएचएमएस अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या फेरीसाठी १ हजार ७७७ जागा रिक्त आहेत.
युनानी (बीयूएमएस) या अभ्यासक्रमाच्या सात महाविद्यालयांमध्ये ३४९ जागा आहेत. यातील तीन सरकारी महाविद्यालयामध्ये १५३, तर खासगी महाविद्यालयांमध्ये १९६ जागा आहेत. दोन फेऱ्यांमध्ये सरकारी महाविद्यालयांतील १४२, तर खासगी महाविद्यालयांतील १७४ जागांवर प्रवेश झाले आहेत. त्यामुळे तिसऱ्या फेरीसाठी ३३ जागा रिक्त असून, त्यात सरकारी महाविद्यालयातील ११ आणि खासगी महाविद्यालयातील २२ जागांचा समावेश आहे.
असे आहे तिसऱ्या फेरीचे वेळापत्रक
आयुष अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या फेरीसाठीची निवड यादी २५ ऑक्टोबर रोजी जाहीर होणार आहे. या यादीमध्ये प्रवेशाची संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांना २६ ते ३० ऑक्टोबर या कालावधीत प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश घ्यावा लागणार आहे.
