मुंबई: चेंबूर परिसरातील तरुणीची छेड काढणाऱ्यांना रोखणाऱ्या तरुणाला बेदम मारहाण करून आरोपीनी हत्या केली. ही घटना बुधवारी घडली. याप्रकरणी टिळकनगर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून तीन आरोपीना अटक केली असून यातील एक आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

जय शिंदे (१८) असे मृत तरुणाचे नाव असून तो चेंबूरमधील सेल कॉलनी परिसरात राहत होता. याच परिसरात राहणाऱ्या एक तरुणीला आरोपी दीपेश भोसले आणि सुमित सोनवणे ३० जुलै रोजी छेडत होते. ही बाब येथील काही नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी या दोघांना विरोध केला. विरोध करणाऱ्यांमध्ये जय शिंदेही होता. जय शिंदेने यापैकी एका आरोपीच्या कानाखाली मारली होती. यामुळे आरोपी संतप्त झाले होते.

बुधवारी मध्यरात्री जय आणि त्याचा एक मित्र लोकमान्य टिळक टर्मिनस परिसरात चहा पिण्यासाठी गेले होते. या ठिकाणी आरोपीही बसले होते. आरोपीनी जय आणि त्याच्या मित्राला बेदम मारहाण केली. यादरम्यान आरोपीनी चाकूने जयच्या छातीवर अनेक वार केले. त्यानंतर आरोपी तेथून पळून गेले. काही रिक्षा चालकांनी घटनेची माहिती टिळक नगर पोलिसांना दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमी तरुणाला राजावाडी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.

टिळक नगर पोलिसांनी याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपी दीपेश भोसले, सुमित सोनवणे आणि एका अल्पवयीन मुलाला अटक केली. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.