मुंबई : गेल्या दहा दिवसांमध्ये मुंबई महापालिकेने दादरच्या कबुतरखाना परिसरातून १६ जणांकडून ७,७०० रुपये दंड वसूल केला. कबुतरांना दाणे घातल्याच्या कारणास्तव हा दंड वसूल करण्यात आला आहे. तर गेल्या दहा दिवसात संपूर्ण मुंबईतून तब्बल १०७ नागरिकांकडून ५५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

मुंबई महापालिकेने कबुतरखाने बंद करण्यासाठी तत्काळ मोहीम राबवावी, असे निर्देश राज्य सरकारने पावसाळी अधिवेशनात ३ जुलै रोजी दिले. त्यानंतर मुंबईतील कबुतरखान्यांचा विषय ऐरणीवर आला आहे. कबुतरांना दाणे घालणाऱ्यांना पाचशे रुपये दंड करण्याची तरतूद पालिकेच्या घनकचरा विभागाच्या नियमावलीत आहे. गेल्या दीड वर्षात मुंबई महापालिकेने कबुतरांना दाणे घालणाऱ्यांकडून ६२ हजार पाचशे रुपये दंड वसूल केला आहे. राज्य सरकारने निर्देश दिल्यानंतर या कारवाईला किंचित वेग आला असून गेल्या १० दिवसांत संपूर्ण मुंबईतून १०७ जणांकडून ५५ हजार ७०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

दंड वसुली कायम

गेल्या अनेक वर्षांपासून कबुतरखाने बंद करण्याची मागणी होत आहे. मात्र राज्य सरकारने अधिवेशनात घोषणा केल्यामुळे या विषयाला वेग आहे. मुंबई महापालिकेच्या घनकचरा विभागाच्या नियमावलीत आधीपासूनच कबुतरांना दाणे घालणाऱ्यांकडून पाचशे रुपये दंड वसूल करण्याची तरतूद आहे. तसेच मार्च महिन्यात मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन आरोग्य आणि स्वच्छता उपविधी २००६ मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. या नव्या नियमावलीतही रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी प्राणी – पक्षांना खाऊ घालणाऱ्यावर दंडात्मक कारवाईची तरतूद मुंबई महापालिकेच्या घनकचर कायद्यातील स्वच्छता व आरोग्य उपविधीच्या नव्या नियमावलीतही अंतर्भूत करण्यात आली आहे. त्यात कबुतरांना सार्वजनिक ठिकाणी खाद्य घालणाऱ्यांकडून ५०० रुपये दंड वसूल करण्याची तरतूद कायम ठेवण्यात आली आहे.

अनधिकृत कबुतरखाने

मुंबईत एकूण ५१ कबुतरखाने असल्याचे पालिकेची आकडेवारी सांगत असली तरी प्रत्यक्षात मुंबईत त्यापेक्षा अधिक कबुतरखाने आहेत. तसेच इतरत्रही अनेक ठिकाणी कबुतरांना दाणे घालण्यात येत असून तेथे अनधिकृत कबुतरखाने उभे राहिले आहेत. तर अनेकदा दुकानदार सकाळी दुकान सुरू करण्यापूर्वी कबुतरांना दाणे टाकतात. त्यामुळे अशा अनधिकृत कबुतरखान्यांचीही भर पडली आहे. तसेच समुद्र किनाऱ्यांवर कबुतरांसाठी धान्य विकत बसणाऱ्यांची संख्या वाढली आहे. हे धान्य विकत घेऊन तिथेच कबुतरांसाठी टाकले जात असल्यामुळे कबुतरांची संख्या वाढत आहे. ही कबुतरे मग आजूबाजूच्या रहिवासी इमारतीच्या खिडक्यांमध्ये घर करतात. त्यामुळे त्यांच्या विष्ठेतून व पिसांमधून श्वसनाचे आजार पसरतात. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हे सर्वच कबुतरखाने हटवण्याची मागणी केली होती.

कबुतरखानेकारवाईदंड वसूली
दादर कबुतरखाना१६७७०० रुपये
मालाडमधील पाच ठिकाणचे कबुतरखाने१५७५०० रुपये
भांडूप कुकरेजा संकुल, एल बी एस मार्ग, संतोषी माता मंदीर मार्ग५५०० रुपये
ठाकूर गाव, कांदिवली पूर्व३५०० रुपये
दौलत नगर, वांद्रे तलाव४००० रुपये
जीपीओ जवळ ३५०० रुपये