मुंबई : सागरी किनारा मार्गाचा दुसरा बोगदा सोमवारपासून सुरू झाल्यानंतर उत्तर दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवरून मंगळवारी मोठ्या संख्येने वाहने धावली. संध्याकाळी ६ वाजेपर्यंत तब्बल १३ हजार वाहनांनी या मार्गिकेवरून प्रवास केला. सध्या ही मार्गिका सकाळी ७ ते रात्री ११ दरम्यान वाहनांसाठी खुली असून मंगळवारी संध्याकाळी उत्तरोत्तर वाहनांची संख्या वाढत गेली होती.

मुंबई महानगरपालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेला धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्पाचा मरिन ड्राइव्हपासून सुरू होणारा दुसरा भूमिगत बोगदा सोमवारी सुरू करण्यात आला. त्यामुळे दक्षिण मुंबईतून उत्तर मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना मोठा दिलासा मिळाला.

हेही वाचा – मुंबई : विनयभंग करून पळणाऱ्या आरोपीला पाठलाग करून महिलेने पकडले; दोन अल्पवयीन मुलींचा केला विभायभंग

मरिन ड्राइव्ह ते हाजी अली दरम्यान उत्तर दिशेने प्रवासासाठी सुमारे ६.२५ किलोमीटर लांबीचा मार्ग खुला झाला आहे. पहिल्याच दिवशी मोठ्या संख्येने वाहनचालकांनी या मार्गावरून प्रवास करणे पसंत केले. मंगळवारी सकाळी ७ वाजल्यापासून या मार्गावर वाहने धावू लागली होती. दर तासागणिक वाहनांची संख्या वाढत होती. तर संध्याकाळी उत्तर दिशेने जाणाऱ्या वाहनांची संख्या अधिक होती. संध्याकाळी ६ वाजेपर्यंत १३ हजार वाहने या मार्गिकेवरून धावली.

हेही वाचा – मुंबई : डेंग्यू, हिवताप प्रतिबंधासाठी ‘फोकाय’ची अमलबजावणी, अतिजोखमीच्या ठिकाणी देणार विशेष लक्ष

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुबई महानगरपालिकेच्या संबंधित विभागाने या मार्गावर सध्या मार्शलची नेमणूक केली आहे. या मार्गावरून धावणाऱ्या वाहनांची संख्या मोजण्याचे काम मार्शल मंडळी करीत आहेत. लवकरच या मार्गावर यांत्रिक पद्धतीने वाहनांची मोजणी करणारी यंत्रणा बसविण्यात येणार असल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.