मुंबई : महानगरपालिका प्रशासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेला धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारा मार्ग (दक्षिण) वाहतुकीसाठी टप्प्याटप्प्याने खुला करण्यात आला आहे. तसेच, या मार्गावर देखरेख ठेवण्यासाठी ठिकठिकाणी निरनिराळी वैशिष्ट्ये असलेले २३६ सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. दिवसभरात किती आणि कोणत्या प्राकरची वाहने या मार्गावरून धावली, वाहनांचा वेग किती होता याची नोंद या कॅमेऱ्यांत होणार आहे.
मुंबईकरांना जलद, सुलभ आणि सुरक्षित वाहतूक सुविधा उपलब्ध व्हावी या हेतूने महानगरपालिकेने मुंबई किनारा रस्ता प्रकल्प उभारला. या मार्गावर बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे मुंबई सागरी किनारी रस्त्यावर कोठेही अपघात झाल्यास त्याची माहिती तात्काळ नियंत्रण कक्षाला मिळते आणि अपघातग्रस्तांना मदत करण्यात येते. तसेच दिवसभरात किती वाहनांनी या मार्गाचा वापर केला, त्या वाहनांचे प्रकार कोणते, किती वाहनांनी वेगाची मर्यादा ओलांडली, याचीही नोंद या कॅमेरा प्रणालीमुळे ठेवणे शक्य होणार आहे.
मार्ग २४ तास सुरू राहणार…
मुंबई सागरी किनारा मार्गावर वेगमर्यादांचे पालन न करणे, शर्यती लावणे, आवाज नियंत्रणात न ठेवणे अशा तक्रारी स्थानिकांकडून प्राप्त होत होत्या. कॅमेरे बसविल्यामुळे महानगरपालिका, तसेच वाहतूक पोलिसांना या प्रकारांवर नियंत्रण ठेवण्यास मदत मिळेल. हे कॅमेरे कार्यान्वित झाल्यामुळे आता हा मार्ग २४ तास सुरू ठेवण्याचे पालिकेचे नियोजन पूर्ण झाले आहे.
२३६ सीसी टीव्ही कॅमेरे कार्यान्वित
शामलदास गांधी मार्ग (प्रिन्सेस स्ट्रीट) उड्डाणपूल ते वरळी-वांद्रे सागरी सेतूच्या वरळी टोकापर्यंत हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पाची लांबी १०.५८ किलोमीटर इतकी आहे. या प्रकल्पावर दोन्ही बाजूने वाहतूक सुरू झाली आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून संपूर्ण प्रकल्पावर ठिकठिकाणी विविध प्रकारचे सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. शामलदास गांधी मार्ग (प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल) ते वरळी वांद्रे सागरी सेतूच्या वरळी टोकापर्यंत चार प्रकारचे वैशिष्ट्य असलेले, एकूण २३६ सीसी टीव्ही कॅमेरे कार्यान्वित झाले आहेत.
कॅमेरे आणि त्यांची वैशिष्ट्ये
१) अपघात ओळखणारे कॅमेरे – मुंबई किनारा रस्ता प्रकल्पात जुळे बोगदे बांधण्यात आले आहेत. या दोन्ही बोगद्यांमधील आंतरमार्गिकांजवळ प्रत्येकी ५० मीटर अंतरावर अपघात ओळखणारे कॅमेरे बसविण्यात आले आहेत. दोन्ही बोगदे मिळून एकूण १५४ कॅमेरे बसविण्यात आले आहेत. जुळ्या बोगद्यांमध्ये वाहनांचे अपघात, चुकीच्या दिशेने जाणारी वाहने इत्यादी घटनांची हे कॅमेरे आपोआप नोंद करतील. तसेच अशी घटना घडल्यानंतर नियंत्रण कक्षाला तात्काळ सूचना देतील.
२) निगराणी कॅमेरे – सामान्यपणे वाहतूक सुरक्षेसाठी ७१ निगराणी कॅमेरे बसविले आहेत. हे कॅमेरे फिरवता, झुकवता व झूम करता येतात. जेव्हा एखादा अपघात होतो तेव्हा या कॅमेऱ्यामधील व्हीआयडीएस प्रणाली स्वयंचलित पद्धतीने संबंधित घटना ओळखते आणि आपोआप त्या घटनेकडे लक्ष केंद्रित करते. दोन्ही भूमिगत बोगद्यांमध्ये असे ७१ कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
३) वाहन मोजणी कॅमेरे – मुंबई किनारा रस्ता प्रकल्पातील भूमिगत बोगद्यांचे प्रवेशद्वार व निर्गमद्वारावर एकूण चार कॅमेरे बसविण्यात आले आहेत. भूमिगत बोगद्यांमध्ये जाणाऱ्या वाहनांची संख्या मोजणे, त्यांचे वर्गीकरण करणे, यासाठी या कॅमेऱ्यांची मदत होते.
४) वाहन क्रमांक ओळखणारे कॅमेरे – मुंबई किनारा रस्ता प्रकल्प हा नव्यानेच उभारण्यात आला असल्यामुळे या ठिकाणी वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि अशी वाहने ओळखण्यासाठी सात कॅमेरे बसविण्यात आले आहेत. वेग मर्यादा ओलांडणाऱ्या वाहनांची छायाचित्रे व त्यांच्या वाहन क्रमांकाची नोंद या कॅमेऱ्यात होते.