मुंबई : मरीन ड्राईव्ह येथील साडेतीन किमी लांबीच्या समुद्री पदपथापेक्षाही लांब असा समुद्री पदपथ नागरिकांसाठी खुला झाला आहे. सागरी किनारा महामार्गाला लागून असलेल्या या समुद्री पदपथाचा काही भाग १५ ऑगस्ट रोजी संध्याकाळपासून खुला झाला. या समुद्री पदपथावरील विस्तीर्ण विहार क्षेत्रावर स्वातंत्र्यदिनी नागरिकांनी भ्रमंती केली आणि समुद्राच्या लाटांचा आनंद लुटला.

श्यामलदास गांधी उड्डाणपूल (प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हर) ते ‘राजीव गांधी सागरी सेतू’च्या वरळी टोकापर्यंत १०.५८ किमी लांबीचा सागरी किनारा रस्ता (कोस्टल रोड) मुंबई महानगरपालिकेने तयार केला आहे. धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता असे या मार्गाचे नाव आहे. या मार्गालगत मरीन ड्राईव्ह प्रमाणेच समुद्री पदपथ (प्रोमेनेड) तयार करण्यात आला आहे. हा मुंबईतील सर्वात मोठा समुद्री पदपथ असून त्याची लांबी ७.५ किमी आहे. यापैकी प्रियदर्शीनी पार्क ते हाजीअली आणि बडोदा पॅलेस ते वरळी या भागातील समुद्री पदपथ स्वातंत्र्य दिनापासून सुरू झाला आहे. एकूण ५.२५ किलोमीटर लांबीचा समुद्री पदपथ आणि चार पादचारी भुयारी मार्ग यांचे गुरुवारी १४ ऑगस्ट २०२५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. तर १५ ऑगस्ट रोजी संध्याकाळपासून नागरिकांना या समुद्री पदपथाच्या विहार क्षेत्रावर प्रवेश देण्यात आला.

निळ्याशार अरबी समुद्राची अथांगता, त्यातून उसळणाऱ्या चित्तथरारक लाटा, डोळ्याचे पारणे फेडणारे विहार क्षेत्र आणि ‘भारत माता की जय’च्या घोषणा, अशा मनोहारी आणि देशभक्तीची ओतप्रोत भावना अशा वातावरणात नागरिकांनी या समुद्री पदपथाचा आनंद घेतला. या समुद्री पदपथावर येण्यासाठी पर्यटकांना भुयारी मार्गातून यावे लागणार आहे. सागरी किनारी मार्गाच्या खाली थोड्या थोड्या अंतरावर भुयारी मार्ग उपलब्ध करण्यात आले आहेत. त्यापैकी चार भुयारी मार्गांचे लोकार्पण करण्यात आले आहे.

महालक्ष्मी (पीयूपी) येथील भुयारी मार्ग क्रमांक ४ आणि वरळी (पीयूपी) भुयारी मार्ग क्रमांक ११ येथून विहार क्षेत्रावर स्वातंत्र्यदिनी तिरंगा रॅली काढण्यात आली. भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून यावेळी नागरिकांना ‘राष्ट्रध्वज तिरंगा’चे वितरण करण्यात आले. नागरिकांनीही हाती राष्ट्रध्वज घेऊन उत्स्फूर्तपणे सफर केली.

मरीन ड्राईव्हपेक्षा मोठा समुद्री पदपथ

मुंबईत सध्या नेताजी सुभाष मार्गालगत असणारा मरीन ड्राईव्ह हा साडे तीन किमी लांबीचा सर्वात लांब समुद्री पदपथ आहे. मात्र सागरी किनारा मार्गालगत होणारा नवीन समुद्री पदपथ हा त्याच्या दुपटीपेक्षा अधिक लांबीचा म्हणजेच ७.५ किमी लांबीचा आहे. या पदपथाची रुंदी २० मीटर आहे. या पदपथालगत सुशोभिकरणासाठी देशी झाडे लावण्यात येणार आहेत. तसेच नागरिकांना बसण्यासाठी कट्ट्यांचे बांधकामही करण्यात येणार आहे

१) भुयारी मार्ग क्रमांक ४ येथे येण्यासाठी भुलाभाई देसाई मार्गावरील आकृती पार्किंग इमारत येथून प्रवेश देण्यात आला आहे.

२) भुयारी मार्ग क्रमांक ६ येथे येण्यासाठी वत्सलाबाई देसाई चौक (हाजी अली जंक्शन) येथून प्रवेश देण्यात आला आहे.

३) भुयारी मार्ग क्रमांक ११ येथे येण्यासाठी खान अब्दुल गफार खान मार्गावरील वरळी दुग्ध शाळेसमोर प्रवेश देण्यात आला आहे.

४) भुयारी मार्ग क्रमांक १४ येथे येण्यासाठी वरळीतील बिंदुमाधव ठाकरे चौक या ठिकाणाहून प्रवेशाची सोय आहे.

५) या सर्व ठिकाणांहून भुयारी मार्गात जाण्यासाठी पायऱ्या तसेच उतार मार्गाची (रॅम्प) व्यवस्था आहे. जेणेकरून सायकलस्वार व अपंग व्यक्ती येथे सहज प्रवेश करू शकतात.

५) विहार क्षेत्रावर सायकल ट्रॅक तयार करण्यात आला आहे. निसर्गसौंदर्य न्याहाळण्यासोबतच विहार क्षेत्रावर आसन व्यवस्थेचीही सोय करण्यात आली आहे.

६) ठिकठिकाणी हिरवळ विकसित करण्यात आली आहे. तसेच उपलब्ध जागेनुसार विविध फुलझाडे, शोभेची झाडे, समुद्र किनारी वाढू शकतील अशी झाडे लावण्यात आली आहे.