मुंबई : ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून असलेले पावसाळी हवामान, मध्येच वाढणारे तापमान या सर्वातून ऑक्टोबर महिन्याच्या मध्यात मुंबईकरांना गारव्याचा अनुभव मिळाला. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात मंगळवारी २४.८ अंश सेल्सिअस तर सांताक्रूझ केंद्रात २४.७ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. हे किमान तापमान गेल्या काही दिवसांच्या तुलनेत कमी नोंदलेले आहे. याआधी किमान तापमानाचा पारा २६ ते २७ अंशादरम्यान नोंदला जात होता.
मुंबईत सध्या पावसाळी वातावरण असून मागील काही दिवसांपासून पाऊस हजेरी लावत आहे. परिणामी तापमानात घट होत आहे. गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ झाली होती. मोसमी पाऊस मुंबईतून माघारी गेल्यानंतर तापमानाच्या पाऱ्यात वाढ झाली होती. गेले अनेक दिवस पारा ३४ ते ३६ अंशादरम्यान नोंदला जात होता. त्यामुळे उकाडा आणि उन्हाचा ताप सहन करावा लागला. दरम्यान, मागील काही दिवसांपासून मुंबईत पावसाला पोषक वातावरण निर्माण झाल्यामुळे तसेच पावसाने हजेरी लावल्याने मुंबईच्या तापमानाच्या पाऱ्यात काहिशी घट झाली आहे. कमाल आणि किमान तापमानाचा पारा तुलनेने कमी आहे. पहाटेचा गारवा असला तरी आर्द्रतेमुळे उकाड्यात वाढ झाली आहे. त्यामुळे दिवसभर उकाडा सहन करावा लागत आहे. त्यानंतर सायंकाळी पाऊस पडतो. सध्या मुंबईत पहाटेचा गारवा, दुपारी उकाडा आणि सायंकाळी पाऊस असे वातावरण अनुभवायला मिळत आहे. मात्र, पहाटेच्या गारव्यामुळे मुंबईकर सुखावले आहेत.
मुंबईत पुढील दोन दिवस पावसाचे
मुंबईत गेल्या दोन तीन दिवसांपासून पाऊस पडत आहे. पुढील दोन दिवस मुंबईत आणखी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे बुधवारी, गुरुवारी मुंबईत हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज आहे. त्यामुळे तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे.
मुंबईची हवा ‘समाधानकारक’
मुंबईत मंगळवारी ‘समाधानकारक’ हवेची नोंद झाली. मुंबईचा एकूण हवा निर्देशांक मंगळवारी ५७ इतका होता. बोरिवली येथील हवा निर्देशांक ३६, भायखळा ३६, चकाला अंधेरी ४८, चेंबूर ३७, घाटकोपर ४१, कांदिवली २४, भांडूप ४०, मालाड ३८, वरळी ४५ आणि शीव येथे हवा निर्देशांक ४४ इतका होता. म्हणजेच येथील हवा चांगल्या श्रेणीत नोंदली गेली. मुंबईत २४ ते २८ ऑक्टोबर या कालावधीत मुंबईची हवा चांगली ते समाधानकारक श्रेणीत नोंदली जात आहे.
