देशात आणि राज्यात इंधनाचे दर सातत्याने वाढत असून, याविरोधात आता विरोधक आक्रमक होताना दिसत आहे. वाढत्या इंधनावरून दिल्लीतील मोदी सरकारवर टीका केली जात आहे. दरम्यान, या इंधन दरवाढीचा विरोध करण्यासाठी मुंबई काँग्रेसच्या वतीने आज (१० जुलै) मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी काँग्रेसचे नेते बैलगाडीतून आले. पण, नेत्यांची गाडीचं मोडल्यानं मोर्चात गोंधळ झाला. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होतं असून, भाजपाने मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांना राजकीय सल्ला दिला आहे.

देशातील पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका उडाला आहे. गेल्या काही दिवसांपासून इंधनाचे दर वाढत असून, याविरोधात काँग्रेसकडून राज्यात ठिकठिकाणी आंदोलनं केली जात आहे. गुरुवारी नागपुरात आंदोलन केल्यानंतर मुंबई काँग्रेसच्या वतीने शनिवारी मुंबईत इंधन दरवाढीविरोधात मोर्चा काढण्यात आला. यावेळी बैलगाडीतून काँग्रेस नेते मोर्चात सहभागी झाले होते. मात्र, ओझ्याने बैलगाडीच मोडली.

हेही वाचा- Petrol Price Today : आज पुन्हा वाढले पेट्रोल-डिझेलचे दर! मुंबई शंभरीपार

घटनेचा व्हिडीओ ट्विट करत भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसला अप्रत्यक्षरीत्या चिमटा काढत मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांना राजकीय सल्ला दिला आहे. उपाध्ये यांनी ट्वीट करत महाविकास आघाडीत सामील झालेल्या काँग्रेसला भविष्यातील वाटचालीबद्दलही इशारा दिला आहे.

केशव उपाध्ये काय म्हणाले?

“भाई जगतापजी, तोल सांभाळा… महाराष्ट्रात अभद्र आघाडी करताना राजकीय तोल गेलाच आहे. तुमचे ओझे पेलताना दोन बैलांनी अंग काढून घेतल्यावर आता सगळे काँग्रेसी कोसळात तसे राज्याच्या राजकारणातही होईल. गाडीला कोणते दोन बैल जोडावे याचा आधीच विचार करा”, असं केशव उपाध्ये यांनी ट्वीट करत म्हटलं आहे.

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्या अध्यक्षतेखाली आज पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात आंदोलन करण्यात आलं. इंधन दरवाढीचा निषेध करण्यासाठी भाई जगताप आणि काँग्रेसचे इतर नेते बैलगाडीतून आंदोलनात सहभागी झाले. मात्र, बैलगाडीची क्षमता लक्षात न घेता नेते, कार्यकर्ते बैलगाडीत चढले. भार जास्त झाल्याने बैलगाडी मोडली आणि भाई जगताप यांच्यासह गाडीत असलेले सर्वच नेते व कार्यकर्ते कोसळले.