मुंबई: कुलाबा-वांद्रे-सीप्झ-आरे भुयारी मेट्रो ३ मार्गिकेतील मेट्रो स्थानकांच्या नावापुढे खासगी कंपन्यांची नावे जोडण्यात आली आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) , सिद्धिविनायक स्थानकांसह अनेक स्थानकांच्या नावापुढे खासगी कंपन्यांची नावे देण्यात आल्याने याविरोधात आता काँग्रेस आक्रमक झाली आहे. हा प्रकार म्हणजे देवदेवता आणि महापुरुषांचा अपमान असून तो खपवून घेणार नाही, असे म्हणत मंगळवारी काँग्रेस रस्त्यावर उतरले. खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सिद्धीविनायक मंदिरासमोर आंदोलन करत स्थानकांची नावे तात्काळ बदलत पूर्ववत करण्याची मागणी करण्यात आली.
मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशनकडून (एमएमआरसी) ३३.५ किमी लांबीच्या मेट्रो ३ मार्गिकेचे बांधकाम करण्यात आले आहे. एमएमआरसीकडूनच या मार्गिकेचे संचलन केले जाते. ही मार्गिका ९ आॅक्टोबरपर्यंत पूर्ण क्षमतेने अर्थात आरे ते कफ परेड अशी धावू लागली आहे. मेट्रो ३ मार्गिका सुरुवातीपासूनच कोणत्या ना कोणत्या वादात अडकलेली दिसते. आता ही मार्गिका सुरु झाल्यानंतरही यावरुन वाद सुरु आहे. या मार्गिकेतील मेट्रो स्थानकांच्या नावापुढील खासगी कंपन्यांच्या नावाला काँग्रेसने विरोध केला आहे. तिकीटाव्यतिरिक्त महसूल मिळविण्यासाठी मेट्रो ३ सह सर्वच मेट्रो मार्गिकांवरील मेट्रो स्थानकांपुढे खासगी कंपन्यांची नावे लावण्याचा अधिकार कंपन्यांना देण्यात येतो. त्यानुसार मेट्रो ३ मार्गिकेतील स्थानकांतील नावांचे अधिकार खासगी कंपन्यांना देण्यात आले असून यातून एमएसआरसीला चांगला महसूल मिळत आहे. पण त्यावर आता काँग्रेसने प्रश्न उपस्थित केला आहे. अशाप्रकारे महसूल जमा करण्याची गरजच काय असे म्हणत वर्षा गायकवाड यांनी एमएमआरसीच्या या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या आधी कोटक असे नाव, सिद्धिविनायक स्थानकाच्या आधी लोम्बार्ड, महालक्ष्मी स्थानकाच्या नावाआधी एचडीएफसी लाईफ अशी नावे वापरण्यात येत आहेत. काळबादेवी, शितलादेवी मंदिर स्थानकासह अन्य स्थानकांपुढेही लवकरच खासगी कंपन्यांची नावे जोडली जाणार आहे. हा देवदेवतांचा आणि महापुरुषांचा अपमान असल्याचे म्हणत याविरोधात मंगळवारी काँग्रेसने सिद्धिविनायक मंदिराबाहेर आंदोलन करत एमएमआरसी आणि महायुती सरकारचा निषेध केला. तेव्हा एमएमआरसीने तात्काळ ही नावे बदलावीत अशी मागणी काँग्रेसने यावेळी केली आहे. यावर आता एमएमआरसी वा राज्य सरकार काय भूमिका घेते हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.
