निष्णात पोलिसांची कमतरता; पोलीस ठाण्यांचा असहकार; आयुक्तांच्या हस्तक्षेपाची पोलिसांची मागणी
कुठल्याही क्लिष्ट गुन्ह्य़ाची उकल करण्यात निष्णात असलेले दल म्हणून जगात मुंबई पोलिसांची ख्याती आहे. या दलाचा कणा म्हणजे तपासकाम करणारी गुन्हे शाखा. परंतु कुशल अधिकारी-कर्मचाऱ्यांची वानवा, पोलीस ठाण्याचे असहकार्य, गुप्त निधीचा आटलेला ओघ यामुळे गुन्हे शाखेची अवस्था मरणासन्न झाली आहे. आयुक्तांनी तातडीने गुन्हे शाखेच्या या अवस्थेकडे लक्ष देत आवश्यक ते बदल करावे, अशी मागणीच खुद्द गुन्हे शाखेतील अधिकारी करत आहेत.
मुंबईत पोलीस ठाण्यांच्या प्रत्येक परिमंडळास एक याप्रमाणे गुन्हे शाखांचे १२ कक्ष कार्यरत आहेत. तसेच खंडणीविरोधी पथक, जबरी चोरी विरोधी पथक, मोटार वाहन विरोधी पथक, मालमत्ता कक्ष यांसारखे इतर पथकही काम करतात. पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आलेल्या गुन्ह्य़ाचा समांतर तपास करत त्याची उकल करण्यात गुन्हे शाखा आणि पोलीस ठाण्यात नेहमीच खेळीमेळीची स्पर्धा राहिली आहे. मात्र २०१५ मध्ये गुन्हे शाखेतील अनेक अधिकारी आणि कर्मचारी यांनी स्वेच्छेने शाखेला सोडचिठ्ठी देत पोलीस ठाण्यांमध्ये नियुक्ती मागितली. जवळपास सर्वच कक्षांतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, निरीक्षक यांना पोलीस ठाण्यांमध्ये नियुक्ती मिळाली आणि ठाण्याच्या पातळीवर तपासकामाला वेग आला. पण गुन्हे शाखेत मात्र अकुशल आणि निरिच्छेने राहिलेले कर्मचारी असल्याने त्यांच्या कामाच्या गुणवत्तेचा आलेख उतरताच आहे. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांकडून काम कसे करून घ्यायचे, असा प्रश्न शाखेतल्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांना पडला आहे. त्यातच पोलीस ठाण्यांनी गुन्हे शाखेला असहकार करण्याचे सत्र सुरू केले. रोज ठरावीक वेळाने गुन्हे शाखेकडून प्रत्येक पोलीस ठाण्याशी संपर्क साधून कोणता नवीन गुन्हा दाखल झाला आहे का, याची विचारणा केली जाते, दाखल गुन्हा गंभीर असल्यास गुन्हे शाखा त्याचा समांतर तपास करण्यास सुरुवात करते. मात्र दाखल गुन्ह्य़ांची माहितीच न देणे, माहिती मिळाली तरी घटनास्थळाचा पंचनामा उपलब्ध करून न देणे, अशा प्रकारचे अडथळेही पोलीस ठाण्यांकडून गुन्हे शाखेच्या कामात आणण्यास सुरुवात झाली. असे करण्याचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांकडूनच मिळाल्याने हात बांधले असल्याचे उत्तर पोलीस ठाण्याकडून मिळत असल्याने गुन्हे शाखेचे अधिकारी त्यांच्या वरिष्ठांकडे तक्रार करण्यापलीकडे काहीच करू शकत नसल्याचे चित्र आहे. समांतर तपास करताना आवश्यक ते पुरावे, माहिती घटनास्थळी पोहोचलेल्या पोलीस ठाण्यांच्या कर्मचाऱ्यांनी खुल्या दिलाने देणे अपेक्षित आहे, मात्र तसे होत नसल्याने काम कसे करायचे, हा प्रश्न पडल्याचे गुन्हे शाखेतील एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. सीसीटीव्ही चित्रीकरण साठवलेला डीव्हीआरच अनेकदा पोलीस जप्त करून ठेवतात त्यामुळे धड संशयितांनाही ओळखता येत नाही, अशी खंतही या अधिकाऱ्याने व्यक्त केली.
पोलिसांसमोरील आव्हाने
* गुन्हेगारांची माहिती देणाऱ्या खबऱ्यांना बक्षीस देण्यासाठी गुन्हे शाखेकडून गुप्त निधी पुरवला जातो. त्यातही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून हात आखडता घेतला जात असल्याने गुन्हे शाखेत नाराजी आहे.
*वरिष्ठ अधिकारी कक्षातील अधिकारी करत असलेल्या पैशांची मागणी त्यांच्या कामगिरीकडे बघून सढळ हाताने देत असत, परंतु आता प्रत्येक मागणीकडे संशयाच्या नजरेतून पाहिले जात असल्याने खबऱ्यांना देण्यासाठी पैसेच नसल्याचे कक्षातील अनेक अधिकारी-कर्मचारी सांगतात. खबऱ्यांचे जाळे नसेल तर गुन्हे शाखा काम कशी करणार, असा प्रश्न एका अधिकाऱ्याने व्यक्त केला.
* पोलीस आयुक्तांनी या सर्व बाबींचा विचार करून गुन्हे शाखेकडे विशेष लक्ष देत, आवश्यक ते बदल तातडीने करावे, अशी मागणी अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे.
संग्रहित लेख, दिनांक 19th Jul 2016 रोजी प्रकाशित
गुन्हे शाखा मरणासन्न!
कुठल्याही क्लिष्ट गुन्ह्य़ाची उकल करण्यात निष्णात असलेले दल म्हणून जगात मुंबई पोलिसांची ख्याती आहे.
Written by अनुराग कांबळे

First published on: 19-07-2016 at 03:36 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai crime branch crippled by staff shortage