मुंबई- काही चोरांचा चोरी करणे हा पारंपरिक धंदा असतो. वडील चोर असले की अनेकदा मुलेही त्यांच्या पावलावार पाऊल ठेऊन चोरी करत असतात. परंतु वडील आणि मुलगा एकत्र चोरी करण्याचे प्रकार तसेच दुर्मीळच. आरे पोलिसांनी अशाच एका वडील-मुलाच्या जोडीला चोरी प्रकरणात अटक केली आहे. हे दोघे सराईत चोर आहेत. पकडले जाऊ नये म्हणून ते कसलाही दुवा मागे ठेवत नव्हते. परंतु पोलिसांनी मात्र त्यांना शोधून काढले आहे.

गोरेगावच्या आरे वसाहतीमधील एका बंगल्यात १८ ऑक्टोबर रोजी चोरी झाली होती. अज्ञात चोरांनी बंगल्याची काच तोडून आत प्रवेश केला होता. बंगल्यातील दागिने तसेच महागड्या धातूच्या मूर्ती असा एकूण ३६ लाखांचा ऐवज चोरून नेला होता. याप्रकरणी आरे पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला होता. मात्र चोरी करणाऱ्या आरोपींचा काहीच सुगावा लागत नव्हता. बंगल्याच्या परिसरातील सीसीटीव्ही मध्ये दोन संशयित फिरताना दिसले. मात्र ओळख लपविण्यासाठी त्यांनी चेहर्यावर मुखपट्टी लावली होती.

चोर निघाले पिता-पुत्र

आरे पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने या चोरीचा तपास सुरू केला होता. आरोपींच्या चालण्याची पध्दती आणि गोपनिय माहितीच्या आधारे दोन जणांना ताब्यात घेतले. हे दोन्ही आरोपी पिता पुत्र होते. नियातउल्ला खान उर्फ जुली (३८) आणि शाहीद खान (१९) अशी त्यांची नावे आहेत. आरोपी हे सराईत गुन्हेगार होते. ते एकत्र चोऱ्या करत होते. मात्र कधी पकडले जात नव्हते. पोलिसांना चकवण्यासाठी ते पुरपूर खबरदारी घेत होते. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसू नये यासाठी मुखपट्टी (मास्क) लावायचे, असे पोलिसांनी सांगितले. आरोपी नियातउल्ला खान हा अनेक वर्षांपासून गुन्हेगारी क्षेत्रात आहे. त्याने मुलालाही तयार केले होते. मुलाच्या मदतीन तो चोरी करायचा. अनेकदा मुलाला पुढे पाठवून नियातउल्ला रेकी करायचा असेही पोलिसांनी सांगितले.

या पथकाने केली कारवाई

आरे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील, पोलीस निरीक्षक मंगेश अंधारे , गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सचिन पांचाळ, नागरे, महाले, गणेश पाटील, बरकडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.